Pakistan: पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याचा धोका; सरकारने देशभरात जारी केला अलर्ट
Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) मोठ्या प्रमाणावर अशांती निर्माण झाली आहे. येथे हिंसाचाराच्या अधिक घटना पहायला मिळत आहेत. पाकिस्तानला एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा (Terror Attacks) धोकाही आहे. सरकारने संपूर्ण देशाला या दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे आणि अधिका-यांना अत्यंत दक्षता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून (TTP) पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले केले जाऊ शकतात, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार, टीटीपी हायकमांडने अलीकडेच त्यांचे  दोन कमांडर मारल्यानंतर, अफगाणिस्तानमध्ये शाहबाज सरकारची भेट घेतली होती. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर दहशतवादी धोका वाढण्याची शक्यता बळावली आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पत्रात चार प्रांतांच्या सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षा वाढवण्याचे आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

या हल्ल्याच्या धोक्यामुळे अमेरिकाही चिंतेत आहे आणि त्यांनी आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे की, जर फार महत्वाचे नसेल तर यावेळी पाकिस्तानला जाणे टाळावे. अमेरिकेने या संदर्भात एक ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली असून त्यात म्हटले आहे की, सध्या पाकिस्तानमध्ये जातीय हिंसाचार पाहायला मिळत आहे, जी चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, अत्यंत महत्त्वाचे असल्याशिवाय पाकिस्तानला जाणे टाळावे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवास न करण्यास सांगितले आहे. (हेही वाचा: Thailand Firing: थायलंडच्या ईशान्य प्रांतात गोळीबार, घटनेत 20 लोक ठार)

या अॅडव्हायझरीमध्ये पुढे म्हटले आहे की, अमेरिकन नागरिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) आजूबाजूच्या भागात जाऊ नये. येथे दहशतवाद आणि लष्करी संघर्षामुळे धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सातत्याने हल्ले करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये दहशतवाद आणि वैचारिक मूलतत्त्ववादाशी संबंधित हिंसाचार वर्षानुवर्षे पाहायला मिळत आहे. या हिंसाचाराचे बळी सामान्य नागरिक, लष्कर आणि पोलीस आहेत.