Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

सध्या कोरोना विषाणूमुळे अनेक लोक आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. पाकिस्तानमध्ये (Pakistan) कित्येक लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये लाहोरच्या दक्षिणेमधील कसूर नावाच्या प्रांतात एक अतिशय दुःखद घटना घडली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका वडिलांनी आपल्या पाच मुलांना रविवारी पाटोकी (Pattoki) येथील जांबर कालव्यामध्ये (Jamber Canal) फेकून दिले आहे. या घटनेनंतर मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यावेळी दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर तिघांचा काही सुगावा लागलेला नाही. दोन मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत. अन्य तिघांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. गरिबीमुळे आलेल्या नैराश्येमधून हे कृत्य घडले असल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानमधील डॉनच्या वृत्तानुसार, कालव्याजवळील ठिकाणाहून पोलिसांनी रिक्षाचालक पिता महंमद इब्राहिमला अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि बचाव अधिकाऱ्यांची मोठी तुकडीही घटनास्थळी पोहोचली आहे. बचाव पथकाच्या सूत्रांनी सांगितले की, 1 वर्षीय अहमद आणि 4 वर्षाची फिजा या दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. चकोकीजवळील बीएस लिंक कालव्यातून दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले, तर उर्वरित तीन मुलांचे शोधकार्य सुरू आहे. (हेही वाचा: आईने तब्बल 28 वर्षे आपल्या मुलाला फ्लॅटमध्ये ठेवले कोंडून; 41 वर्षीय पिडीत व्यक्तीची झाली 'अशी' अवस्था)

न्यूज इंटरनेशनलने दिलेल्या वृत्तानुसार, बीएस लिंक कालव्यावर तीन वर्षांची ताशा, पाच वर्षांची झैन आणि सात वर्षाची नादिया यांचा शोध घेतला जात आहे. इब्राहिम फार मोठ्या आर्थिक टंचाईचा सामना करीत होता. इब्राहिम आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमीच आर्थिक परिस्थितीवरून भांडण होत असे. इब्राहिमची पत्नी आपल्या मुलांसह माहेरी होती. जेव्हा इब्राहिम आपल्या मुलांना भेटण्यासाठी सासरी गेला तेव्हाही पती पत्नींमध्ये भांडण झाले व त्यानंतर इब्राहिमने मुलांना कालव्यात फेकून देण्याचे पाऊल उचलले.