PakVac Corona Vaccine: बाजारात आली Pakistan ची Covid-19 लस; चीनच्या मदतीने केली तयार, मात्र प्रभावीपणाबाबत माहिती लपवली
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूच्या च्या उद्रेकामुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. अनेक देशांमध्ये लसीकरणावर भर दिला आहे, मात्र लसीकरणानंतरही कोरोना पूर्णपणे नियंत्रित झालेला दिसत नाही. अशा परिस्थितीत आता पाकिस्तानने (Pakistan) आपली स्वतःची कोरोना लस सादर केली आहे. पाकिस्तानने लॉंच केलेल्या कोरोना लसीला पॅकवॅक (PakVac) असे नाव देण्यात आले आहे. या लसीमुळे आता पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामागचे कारण असे आहे की, पाकिस्तान सरकारने या लसीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. पाकिस्तानने चीनच्या मदतीने ही लस विकसित केली आहे.

हेच कारण आहे की पाकिस्तानने ही लस सादर केल्याबरोबरच याबाबत प्रश्न उद्भवले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही लस कोरोना नियंत्रित करण्यासाठी  किती प्रभावी आहे, तसेच किती जणांवर याची चाचणी घेण्यात आली आहे आणि चाचणीचा निकाल काय लागला आहे हे पाकिस्तानकडून सांगण्यात आले नाही. जगभरात कोरोना लसीबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानला जनतेला आपली स्वदेशी लस देऊन लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करायचे आहे. बकरी ईदच्यावेळी लोकांच्या गर्दीमुळे हे संक्रमण जास्त वेगाने पसरू नये, हा या मागील हेतू आहे.

यासंदर्भात पाकिस्तान सरकारकडून असे म्हटले होते की, ईद-उल-अजहा (बकरी ईद) चा सण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आहे. त्यामुळे जर लसीकरणाची गती वाढविली गेली नाही तर सणावेळी पाकिस्तानच्या नागरिकांना पुन्हा एकदा कडक निर्बंध सहन करावे लागू शकतात. (हेही वाचा: जगात पहिल्यांदाच मानवामध्ये आढळला बर्ड फ्लूचा H10N3 स्ट्रेन; जाणून घ्या किती धोकादायक आहे)

पाकिस्तानची कोरोना लस लॉंच झाल्यानंतर पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरचे प्रमुख असद उमर म्हणाले की, लस तयार करण्यात चीनने आम्हाला खूप मदत केली. चीन कोणत्याही परिस्थितीत नेहमीच आमच्या पाठीशी उभा राहतो आणि तो पाकिस्तानचे सच्चा मित्र आहे. ओमर यांनी चीनच्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि सांगितले की आमच्या लासीने सर्व चाचण्या, गुणवत्ता पार केल्या आहेत, आता आम्ही आमच्या नागरिकांना लवकरात लवकर लस देण्यास तयार आहोत.