Paedophiles in French Church: फ्रांसच्या चर्चमध्ये हजारो पाद्री आणि स्टाफकडून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
Church | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

लहान मुलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे, घटना याआधी समोर आल्या आहेत. आता असेच फ्रान्सच्या (France) अनेक चर्चमध्ये मुलांसोबत होऊन गेलेल्या अत्याचाराचा एक खळबळजनक अहवाल समोर आला आहे. या अहवालामुळे अनेकांना धक्का बसला आहे. स्वतंत्र आयोगाच्या चौकशी (Independent Commission Investigating) अहवालात म्हटले आहे की, 1950 पासून फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये हजारो पेंडोफाइल (Paedophiles) सक्रिय होते. पेडोफाइल म्हणजे मुलांवर वाईट नजर ठेवून त्यांचे लैंगिक शोषण करणे. आयोगाच्या संशोधनात म्हटले आहे की, चर्चमध्ये 2,900 ते 3,200 दरम्यान पेडोफाइल पाद्री आणि इतर चर्च सदस्य सक्रिय होते.

या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या स्वतंत्र आयोगाच्या प्रमुखाने एएफपी वृत्तसंस्थेला हा अहवाल जाहीर होण्याच्या काही दिवस आधी ही माहिती दिली होती. फ्रान्सच्या चर्चांवर अडीच वर्षांच्या सखोल संशोधनानंतर आयोगाचा हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. हे संशोधन चर्च, न्यायालये, पोलीस संग्रह आणि साक्षीदारांच्या मुलाखतींवर आधारित आहे.

जीन-मार्क सॉवे म्हणाले की हा, अहवाल 2,500 पृष्ठांचा आहे. या अहवालात गुन्हेगारांची संख्या आणि पीडितांची संख्या या दोन्हींची माहिती दिली जाईल. यासह, चर्चमध्ये हे पेडोफाइल कसे सक्रिय राहिले आणि यासाठी त्यांनी कोणती संस्थात्मक आणि सांस्कृतिक साधने वापरली याची माहिती देखील दिली जाईल. याशिवाय अहवालात 45 प्रस्ताव दिले जातील. ही घटना उघडकीस आल्यानंतर फ्रान्समध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

फ्रान्ससह जगभरातील चर्चमध्ये लैंगिक अत्याचाराची प्रकरणे समोर आल्यानंतर बराच गोंधळ माजला होता. यानंतर, 2018 मध्ये फ्रेंच कॅथोलिक चर्चने स्वतंत्र आयोगाची स्थापना केली. पोप फ्रान्सिसने कॅथोलिक चर्चमधील लैंगिक शोषणाबद्दल जागरूक असलेल्या लोकांसाठी ऐतिहासिक उपाय मंजूर केल्यानंतर हा आयोग स्थापन करण्यात आला. या अंतर्गत, चर्चमधील लैंगिक अत्याचाराची माहिती असणाऱ्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांना याबद्दल माहिती देणे बंधनकारक करण्यात आले. यानंतर अशी बरीच माहिती समोर आली. (हेही वाचा: तब्बल 10 वर्षे पत्नीला ड्रग्ज देऊन अनोळखी लोकांकडून करवला बलात्कार, Video ही शूट केला; कोर्टाने सुनावली दहा वर्षांची शिक्षा)

22 कायदेशीर व्यावसायिक, डॉक्टर, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि धर्मशास्त्रज्ञ अशा लोकांसह या आयोगाची स्थापना करण्यात आली. 1950 च्या दशकात पादरी लोकांकडून बाल लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करणे हे आयोगाचे काम होते. जेव्हा आयोगाने आपले काम सुरू केले, तेव्हा साक्षीदारांना त्यांचा पक्ष समोर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. यासह, यासाठी एक दूरध्वनी हॉटलाइन देखील स्थापित केली गेली. त्यानंतर हजारो लोकांनी एका महिन्यात याबाबतची माहिती देणे सुरु  केले. अनेकांनी त्यांच्याविरुद्ध झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.