सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत आहे. दरम्यान यामध्ये अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. अशामध्ये अमेरिकेमध्ये राष्ट्रीय प्रार्थना दिवसाचं औचित्य साधत व्हाईय हाऊसमध्ये रोज गार्डनमध्ये एका हिंदू पुजार्याने पवित्र वैदिक शांति पाठाचं (Shanti Paath) मंत्रोच्चारण केले. हा शांती पाठ कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी करण्यात आल्याचं समजतं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आमंत्रणावरून न्यूजर्सीमधील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे पुजारी हरीश ब्रह्मभट्ट (Pujari Harish Brahmbhatt) पोहचले होते. अन्य धर्मातील मंडळीदेखील याप्रसंगी तेथे उपस्थित होते.
ब्रम्हभट्ट यांनी यावेळेस रोज गार्ड्न मंचावर माहिती देताना सांगितलं,' कोव्हिड 19, सोशल डिस्टंसिंग, लॉकडाऊन या काळामध्ये लोकांच्या मनात बेचैनी वाढणं हे सामान्य आहे. हे शांती पाठाचे उच्चारण प्रसिद्धी, यश मिळवण्याचा किंवा स्वर्गात जाण्यासाठी केली जाणारी प्रार्थना नव्हे. हे शांती पाठ यजुर्वेदातून घेण्यात आलेल्या मंत्राची रचना असून तिच्या उच्चारणामुळे मनाची अस्वस्थता कमी होते.' या संस्कृत मंत्रपठणानंतर त्यांनी इंग्रजीमध्येही अनुवाद केला. दरम्यान डॉनल्ड ट्रम्प यांनी देखील ब्रम्हभट्टांचे आभार मानले.
दरम्यान अमेरिकेची फर्स्ट लेडी आणि डॉनल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांनीदेखील याप्रसंगी कोव्हिड 19 मध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रति शोक व्यक्त केला आहे. तर डॉनल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय प्रार्थना दिवस दिवशी देशाला संबोधित करताना आपण एका भयावह आजाराचा सामना करतोय, त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतोय. अमेरिकेने यापूर्वीही अनेक कठीण प्रसंगातून बाहेर पडताना धर्म,आस्था, प्रार्थना आणि ईश्वरीय शक्तीवर विश्वास ठेवला होता. असं म्हटलं आहे.