धक्कादायक: आता प्राण्यांनाही कोरोना व्हायरसचा धोका; Covid-19 ची लागण झालेल्या व्यक्तीच्या कुत्र्यालाही झाला Coronavirus
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

चीनमधील वुहानपासून पसरलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) हळूहळू जगातील अनेक देशांना विळखा घातला आहे. चीनमध्ये या प्राणघातक रोगामुळे अडीच हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील लाखो लोक या आजाराने असुरक्षित झाले आहेत. दरम्यान, याबाबत आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. हाँगकाँगमध्ये (Hong Kong) पाळीव कुत्र्यात (Pet Dog) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, हाँगकाँगमधील 60 वर्षीय महिलेच्या पाळीव कुत्र्यात कोरोनाची पुष्टी झाली आहे. मानवाकडून जनावराला कोरोना संसर्ग होण्याची ही पहिली घटना आहे व हे खूप धोकादायकही आहे.

कोरोना विषाणू असा जनावरांमध्येही पसरू लागला, तर तो थांबविणे फारच अवघड ठरू शकेल. हाँगकाँगमधील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी तिच्या कुत्र्यातही कोरोनाची पुष्टी झाली. पाळीव प्राण्यांमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाल्यानंतर, त्यावर स्वतंत्रपणे उपचार केले जातात. प्राण्यांवर प्राणी केंद्रात हे उपचार होतात. प्राणी केंद्राच्या कृषी मत्स्य संवर्धन विभागाने (एएफसीडी) म्हटले आहे की, पाल्मेरियन कुत्र्याची कोरोनाबाबत अनेकवेळा तपासणी केली गेली होती. तपासणीत कमी प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग आढळला आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरसमुळे जागतिक मृत्युदर 3.4 टक्क्यांवर पोहचला)

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हाँगकाँगमध्ये खळबळ उडाली आहे. आता हाँगकाँगमध्ये कुत्रेही स्वतंत्रपणे ठेवण्यात येत आहेत. कोरोनाबाबत सध्या दोन कुत्रे निरीक्षणाखाली आहेत. हाँगकाँगमध्ये आतापर्यंत 104 लोकांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण आढळले आहे. दरम्यान, चीनमधील वुहान येथून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगातील 70 हून अधिक देश प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे सुमारे 3100 लोक मरण पावले आहेत आणि 90 हजार लोकांत कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्याचबरोबर भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूची 29 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत.