North Korea Sends Balloons Filled With Trash: उत्तर कोरियाचे घृणास्पद कृत्य; दक्षिण कोरियामध्ये पाठवले कचरा, मल-मुत्राने भरलेले 200 हून अधिक फुगे, पहा व्हिडिओ (Watch)
North Korea Sends Balloons Filled With Trash (संग्रहित संपादित प्रतिमा)

North Korea Sends Balloons Filled With Trash: तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीने सारे जग घाबरले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या हमास-इस्राईल युद्धाचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. दुसरीकडे उत्तर कोरियादेखील (North Korea) दक्षिण कोरियाला (South Korea) क्षेपणास्त्रे आणि अणुबॉम्बच्या धमक्या देत आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणाव जगासाठी नवीन नाही. मात्र आता उत्तर कोरियाने असे काही केले आहे, ज्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. उत्तर कोरियाने मोठ्या फुग्यांमध्ये (Balloons) कचरा, मल-मुत्र भरून हे फुगे दक्षिण कोरियाला पाठवले आहेत.

दक्षिण कोरियाच्या लष्कराच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने सांगितले की, मंगळवारी रात्री सुमारे 200 हून अधिक फुग्यांमध्ये भरलेला कचरा दक्षिण कोरियात पोहोचला. त्यांनी पुढे सांगितले की, हे फुगे उत्तर कोरियाने उडवले होते, जे दक्षिण कोरियाच्या सीमावर्ती भागात तसेच राजधानी सेऊल आणि दक्षिण-पूर्व प्रांत ग्योंगसांगमध्ये पडले. आता दक्षिण कोरियाने औपचारिक आदेश जारी करत, लोकांना चुकूनही या फुग्यांना हात लावू नका, असा इशारा दिला आहे.

पहा व्हिडिओ- 

बीबीसीच्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाचे सैन्य जनतेला वारंवार इशारा देत आहे की, जर तुमच्या आजूबाजूला कुठेही असे फुगे दिसले तर कृपया त्यांच्यापासून दूर राहा. त्यांना अजिबात हात लावू नका कारण ते, कचरा आणि मल-मुत्राने भरलेले आहेत. दक्षिण कोरियाच्या आठ सीमावर्ती राज्यांमध्ये कचऱ्याने भरलेले किमान 260 फुगे टाकण्यात आले आहेत. यापूर्वी, उत्तर कोरियाचे उप संरक्षण मंत्री किम कांग इल यांनी इशारा दिला होता की, शेजारील दक्षिण कोरियावर आम्ही इतके फुगे टाकू की, तिथे कचरा आणि घाणीचे ढीग उभे राहतील. तेव्हापासून उत्तर कोरिया सातत्याने फुगे सोडत आहे.

हे फुगे मुद्दाम सरकारी कार्यालये, बाजारपेठा, वसाहती आणि लोकांच्या घरांजवळ सोडले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरू लागली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये पांढऱ्या पारदर्शक फुग्यांमधून दोरीने बांधलेल्या पिशव्या पडताना दिसत आहेत. त्यांचा रंग आणि वास पाहता त्यात विष्ठा असल्याचे दिसते. दक्षिण कोरियाच्या लष्कराने हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने उत्तर कोरियाला हे अमानवी आणि घृणास्पद कृत्य थांबवण्याचा इशारा दिला.