उत्तर कोरिया: पाच राजदूतांना देहदंड; डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा अयशस्वी ठरल्याने हुकुमशाहा किम जोंग उन याने दिली शिक्षा
U.S. President Donald Trump (L) and North Korea's President Kim Jong-Un (R) (Photo Credit: Wikimedia Commons)

उत्तर कोरिया (North Korea) देशाचा हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) याने आपल्याच देशाच्या पाच राजदूतांना देहदंड ठोठावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासोबतची बोलणी अयशस्वी ठरल्याने किम जोंग याने या राजदूतांना देहदंड ठोठावला. दक्षिण कोरियाई वृत्तपत्रात आलेल्या वृत्ताच्या हवाल्याने जगभरातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, किम हयोक चौल यांच्यावर नॉर्थ कोरियाने अमेरिकेसोबत संबंध सुधारण्याची जबाबदारी सोपवली होती. ते किम यांच्यासोबत विशेष ट्रेनने गेले होते.

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, चौल यांना सुप्रीम लिडर किम जोंग यांचा विश्वासघात केल्याबद्दल शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चोसुन इबो नावाच्या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, चौकशीनंतर किम हयोक चोल यांना मार्च महिन्यात मिरिम विमानतळावर परराष्ट्र मंत्रालयाच्या इतर चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गोळी झाडून ठार मारण्यात आले. दरम्यान, या वृत्तात इतर चार अधिकाऱ्यांचे नाव जाहीर करण्यात आले नाही. चोल हे फेब्रुवारी महिन्यात हनोई समीट दरम्यान, अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीफन बीगन यांच्या समांतर अधिकार पदावर होते. (हेही वाचा, अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित, ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय; तंत्रज्ञानाची चोरी रोखण्यासाठी उचलले पाऊल)

कोरियाई प्रकरणांमध्ये लक्ष घालणाऱ्या दक्षिण कोरियायी मंत्रालयने या वृत्तावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या आधी अनेकदा म्हटले आहे की, या आधीही नॉर्थ कोरियामधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशाच प्रकारे ठार मारण्यात आले आहे.

राजकीय सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी काही महिन्यांपूर्वीच वृत्त दिले होते की, बैठकीत झालेल्या एका चुकीमुळे किम जोंग उन यांची महिला इंटरप्रेटर शिन हे यांग हिला तुरुंगात टाकण्यात आले होते. ट्रम्प यांनी 'नो डील' ची घोषणा केली तेव्हा शिन हे यांग ही किम यांचा नवा प्रस्ताव भाषांतरीत करु शकली नव्हती. दरम्यान, किम आणि ट्रम्प हे दोन्ही नेते व्हिएतनामच्या राजधानीतून कोणत्याही निर्णायक संवादाशिाय परतले होते. ते प्योंगयांग अण्वस्त्र कार्यक्रमावरुन कोणत्याही समझोत्यापर्यंत पोहोचले नव्हते.