अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित, ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय; तंत्रज्ञानाची चोरी रोखण्यासाठी उचलले पाऊल
File image of US President Donald Trump | (Photo Credits: Getty)

सध्या अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये तुंबळ व्यापार युद्ध (Trade War) चालू आहे. चीनकडून होत असलेली तंत्रज्ञानाची चोरी ही अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. याच कारणाने सावध पावले टाकत आहे, अमेरिकेत आणीबाणी (National Emergency) घोषित करण्यात आली आहे. बुधवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ही घोषणा केली. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण होत आहे, असे कारण देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या इतर देशांच्या तंत्रज्ञानाबाबत निर्णय घेतला जाईल.

सचिव विल्बर रॉस  (Wilbur Ross) यांनी, इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून कार्यकारी आदेशाद्वारे हे पाऊल उचलले आहे. यामुळे अमेरिकेच्या कंपन्या राष्ट्रीय सुरक्षेत अडचणी आणणाऱ्या परदेशी टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरू शकणार नाहीत. याबाबत अमेरिकेने कोणत्याही कंपनीचे नाव नमूद केले नाही. मात्र हुवाई (Huawei) कंपनी बऱ्याच काळापासून चीनी लष्करी किंवा सुरक्षा सेवांद्वारे गुप्तचर म्हणून काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हुवाईने हे आरोप फेटाळून लावले असले तरी, यामुळेच अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयामुळे, ‘अमेरिकन कंपन्यांचे आणि नागरिकांचे नुकसान होईल,’ अशी प्रतिक्रिया हुवाईने दिली आहे.

(हेही वाचा: भारतामध्ये निर्माण होणार रोजगाराच्या नव्या संधी?; अमेरिकेच्या चीनमधील 200 कंपन्या येणार भारतात)

याआधी अमेरिकेचे तंत्रज्ञान चीनकडे जाऊ नये म्हणून, हुवाईवर बंदी घालण्यात आली होती. आता युरोपातील देशही अशाच प्रयत्नात आहेत. युरोपियन कंपन्या जेव्हा चीनकडे जातात तेव्हा त्यांच्यावर तंत्रज्ञान मिळवण्यासाठीदबाव आणला जातो. यामुळेच आता बरेचशे देश चीन विरोधात ठाकले आहेत. दरम्यान अमेरिकेने हुवाईचा समावेश 'एन्टीटी यादी'त केला. यामुळे इथून पुढे हुवाईला अमेरिकन कंपन्यांमधले तंत्रज्ञान ताब्यात घेताना सरकारची परवानगी घेणे गरजेचे ठरणार आहे.