खुशखबर! भारतामध्ये निर्माण होणार रोजगाराच्या नव्या संधी?; अमेरिकेच्या चीनमधील 200 कंपन्या येणार भारतात
Image used for representational purpose. (Photo Credits: PTI)

सध्या जगातील महासत्ता म्हणून अमेरिके (America) कडे पहिले जाते. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून चीन (China)अमेरिकेला टक्कर देण्यासाठी सज्ज होत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती, कामगारांचे मुबलक प्रमाण, कमी खर्चात उपलब्ध होणारी साधन सामग्री यांमुळे अमेरिकेने चीनमध्ये आपल्या अनेक कंपन्या वसवल्या आहेत. यामुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला, मात्र आता अमेरिका चीनमधील तब्बल 200 कंपन्या भारतात हलवण्याचा विचार करत आहे. भारत आणि अमरिका यांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे यूएस-इंडिया स्टॅस्टेजिक अॅण्ड पार्टनरशिप समुहाने सांगितले.

काही कालावधीपासून अमेरिका चीन ऐवजी दुसऱ्या पर्यायाचा विचार करत होती. सर्व गोष्टी पाहता यासाठी भारत हा अधिक चांगला पर्याय असल्याचे समोर आले आहे. यासाठी अनेक भारतामधील अनेक कंपन्यांसोबत चर्चा सुरु असून, निवडणुकीनंतर येणाऱ्या नव्या सरकारला हा समूह सुधारणांबाबतचा सल्ला देणार आहे. नव्या येणाऱ्या सरकारने सुधारणांची गती वाढवायला हवी, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणायला हवी, अधिक पक्षांसोबत चर्चा करण्यावर भर द्यायला हवा यामुळे या दोन्ही देशांतील व्यापाराला अधिक चालना मिळेल असे समूहाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले. (हेही वाचा: चीन- पाकिस्तान भ्रटाचार करण्यात अव्वल, जगातील भ्रष्ट देशांची नावे जाहीर)

या कंपन्या भारतात स्थलांतरीत होण्याच्या निर्णयामुळे चीनला फार मोठा धक्का बसणार आहे, तर भारतामध्ये मोठी गुंतवणूक होऊन नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या काळात भारतातील बेरोजगारीचा दर फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नव्या येणाऱ्या सरकारसमोर हा दर कमी करणे हे फार मोठे आव्हान असणार आहे, या पार्श्वभूमीवर ही नव्याने होणारी गुंतवणूक दिलासादायक ठरू शकते.