Nobel Prize 2018 : रसायनशास्त्र विभागातील नोबेल पुरस्काराची घोषणा
(Photo Credits: Twitter, @NobelPrize)

नोबेल पुरस्कार आठवड्यातील औषधशास्त्र, भौतिकशास्त्र विषयांतील पुरस्कारानंतर आज रसायनशास्त्र विभागातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. फ्रान्सेस अरनॉल्ड, जॉर्ज स्मिथ आणि ग्रेगरी विंटर या तीन शास्त्रज्ञांना विभागून यंदाचा रसायनशास्त्र विभागातील  पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या शास्त्रज्ञांनी नवीन रासायनिक पदार्थांची निर्मिती करुन उत्क्रांतीच्या अभ्यासाला नवी दिशा दिली असल्याने हा नोबेल पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.

प्रोटीन आणि एन्झामाईन विषयातील महत्त्वपूर्ण संशोधन या शास्त्रज्ञांनी केले आहे. अरनॉल्ड यांनी एन्झामाईन बनविण्याची थेट प्रक्रिया शोधून काढली आहे. याचसोबत स्मिथ आणि विंटर यांनीही प्रोटीन निर्मिती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारे घटक बनवले आहेत.

यातील दोन शास्त्रज्ञ हे अमेरिकेचे असून ग्रेगरी विंटर हे ब्रिटनचे आहेत. रसायनशास्त्रातील हा 110 वा नोबेल पुरस्कार असून बहुचर्चित शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात येणार आहे.

याआधी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संशोधक जेम्स पी अॅलिसन आणि तासुकू होंजो यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात येणार आहे. काल भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार आर्थर अश्किन, गेरार्ड मौरो आणि डोना स्ट्रिकलँड यांना जाहीर झाला आहे.

नोबेल समितीतील सदस्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्याने यावर्षी साहित्याचा नोबेल पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय अकादमीने घेतला आहे.