प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

भारतीय वायुसेनेच्या कारवाईनंतर पाकिस्तानला कोणत्याही आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अथवा देशाकडून कोणतेही समर्थन मिळणे बंद झाले आहे. आता पाकिस्तान राजनैतिक आघाडीवर पूर्णपणे एकटा पडला आहे. चीननेही पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला देऊन मोठा झटका दिला आहे. याआधी चीनने पाकिस्तानची सर्वतोपरी मदत केली होती, मात्र आता चीननेही माघार घेतली आहे. पाकिस्तानच्या बालाकोट प्रांतात भारतीय वायुसेनेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते. अहवालात म्हटले आहे की, या हल्ल्यात अनेक दहशतवादी, प्रशिक्षक व वरिष्ठ कमांडरदेखील ठार झाले आहेत. 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय वायुसेनेने अशी कारवाई केली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग म्हणाले की, ‘दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आणि दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी भारताने जागतिक कार्यवाही केली आहे.’ अमेरिकेमध्ये पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी म्हणाले की, ‘भारताच्या हल्ल्यानंतर चीनसह इतर कोणत्याही देशाने काहीच वक्तव्य केले नाही. जो देश आतंकवादाला थारा देतो आज त्या देशावरचा विश्वास उडाला आहे. (हेही वाचा: भारतीय लष्कराची सतर्कता पाहून पाकिस्तानी विमानांनी काढला पळ)

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपसातील तणावाबाबत राजनैतिक तोडगा काढून संबंध सुरळीत करावेत आणि त्या प्रदेशामध्ये शांतता कायम राखावी असे आवाहन ब्रिटनने दोन्ही देशांना केले आहे. तर पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, असे अमेरिकेकडून पाकिस्तानला सांगण्यात आले आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानी लोकांना त्यांच्या जमिनीवर आतंकवादी लोकांना सुरक्षित आश्रय न देण्यास दबाव आणला आहे. पुलवामा हल्ल्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यावी असे सांगितले होते. मुस्लिम देशांकडूनही पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही.

पाकिस्तानी सीमेवर भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर पाकिस्तानने ओएनसी (इस्लामिक सहकारी संघटना) या संघटनेच्या पुढील बैठकीत भारताला आमंत्रित करण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती, परंतु यूएईने यावर लक्ष दिले नाही. पहिल्यांदा, ओआयसीमध्ये भारताला अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे, जो की पाकिस्तानसाठी एक मोठा झटका आहे.