Gosiame Thamara Sithole (Photo Credit : Twitter)

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये एका महिलेने दहा मुलांना जन्म दिला असल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. गोसीयाम थमारा सिथोले (Gosiame Thamara Sithole) असे या महिलेचे नाव असून तिने दावा केला होता की, तिने सात मुले व तीन मुलींना जन्म दिला आहे. या महिलेच्या दाव्यानंतर त्याची पुष्टी करण्यासाठी दक्षिण आफ्रिका सरकारने तिचा शोध सुरू केला. मात्र गोसीयाम गायब असून अजूनही तिचा पत्ता मिळाला नाही. आता तिच्या कुटुंबाचे एक निवेदन समोर आले असून, त्यांनीही ती गायब असल्याचे सांगितले आहे.

साधारण 8-9 दिवसांपूर्वी गोसीयामचा बॉयफ्रेंड टेबोगो त्सोतेसी याने माध्यमांना माहिती दिली होती की त्याच्या गर्लफ्रेंडने 10 मुलांना जन्म दिला आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अजूनही टेबोगो आपल्या मुलांना भेटू शकला नाही, कारण त्याला आपली गर्लफ्रेंड नक्की कुठे आहे हेच माहित नाही. आता या महिलेचा प्रियकर म्हणतो की, त्याच्या प्रेयसीने 10 मुलांना जन्म दिला यावर त्याचा विश्वासच नाही. दक्षिण आफ्रिकेच्या माध्यमांनुसार, गोसीयामने आपल्या प्रियकराला सांगितले होते की, तिने 8 जूनच्या मध्यरात्री 10 मुलांना जन्म दिला.

याबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात असल्याने 15 जून रोजी टेंबिसा येथील आपल्या घरी त्सोतेसी कुटुंब एकत्र आले होते. या बैठकीला त्यांचे दूरचे नातेवाईकही उपस्थित होते. यावेळी टेबोगोने त्याच्याकडे असलेली सर्व माहिती कुटुंबियांना दिली. टेबोगोने सांगितले की, तो अजूनही आपली गर्लफ्रेंड आणि मुलांना भेटला नाही. त्याने फक्त गर्लफ्रेंडने फोनवर सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला. त्याने अनेकवेळा आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्याचा प्रयत्न केला मात्र गोसीयामने ती नेमकी कुठे आहे व मुलांची स्थिती कशी आहे याबाबत काहीही माहिती दिली नाही. (हेही वाचा: काय सांगता? महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म; Guinness World Record मध्ये होणार नोंद- Reports)

कुटुंबाने सांगितले की, गोसीयामने 10 मुलांना जन्म दिला आहे याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. फक्त फोन व मेसेजवरूनच आम्हाला माहिती मिळाली आहे. याआधी टेबोगोने लोकांना आवाहन केले होते की, जोपर्यंत ते आईला व या 10 मुलांना पाहत नाहीत तोपर्यंत त्यांनी गोसीयामला पैसे दान करू नये.