सध्या भारतासह अनेक देश कोरोना विषाणू (Coronavirus) विरुद्ध लढा देत आहेत. अमेरिकेत तर या विषाणूमुळे हाहाकार मजला आहे. अशात गेल्या अनेक दिवसांपासून न्यूझीलंड (New Zealand) मध्ये कोरोना इन्फेक्शनची खूप कमी प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी येथे फक्त एकच प्रकरण समोर आले. त्यानंतर आता न्यूझीलंडचे पंतप्रधान जसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी दावा केला आहे की, देशाने कोरोना विषाणूविरुद्धची लढाई जिंकली आहे. या विषाणूवर विजय मिळवून न्यूझीलंड आता पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेनंतर काही तासांनी न्यूझीलंडने सामाजिक निर्बंधाच्या कठोर मार्गदर्शक सूचनांना शिथिल केले.
आता, मंगळवारपासून काही अत्यावश्यक नसलेले व्यवसाय, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रातील कामे सुरू होतील. परंतु अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, जरी रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे. बरेच लोक अजूनही घरीच राहतील आणि लोकांना सामाजिक अंतर पाळावे लागेल. अर्डर्न यांनी देशातील सर्व अर्थव्यवस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी मागील 24 तासांत कोरोना विषाणूच्या केवळ एका नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह, 50 लाख लोकसंख्या असलेल्या देशातील 19 मृत्यूसह एकूण प्रकरणांची संख्या 1,122 झाली आहे. अशा प्रकारे नवीन प्रकरणांची संख्या कमी झाल्यावर अर्थव्यवस्था सुरुळीत करण्यासाठी लॉक डाऊन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ब्लूमफिल्ड आणि पीएम अर्र्डन यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, लॉक डाऊनचा अंत जाहीर केल्याचा अर्थ असा होत नाही की कोरोना संसर्गाचे कोणतेही प्रकरण उद्भवणार नाही. फक्त अशी प्रकरणे समोर येण्याचे प्रमाण कमी असेल आणि सरकार त्याचा सामना करू शकेल.
तसेच न्यूझीलंडमध्ये व्यापकपणे समुदायामधून या व्हायरसचे प्रसारण होण्याचे कोणतेही प्रकरण नाही. आम्ही युद्ध जिंकले आहे परंतु सर्वांनाच जागरुक राहण्याची गरज आहे, असेही पीएम म्हणाल्या.