Nancy Pelosi Taiwan Visit: चीनच्या नाकावर टिच्चून अमेरिकेने दिला तैवानला पाठींबा; नॅन्सी पेलोसी यांची भेट ड्रॅगनसाठी ठरली डोकेदुखी
Nancy Pelosi. (Photo Credits: IANS)

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) त्यांचा तैवान (Taiwan) दौरा आटोपून दक्षिण कोरियाला रवाना झाल्या आहेत. पेलोसी मंगळवारी रात्री उशिरा तैवानला पोहोचल्या. पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चीन (China) प्रचंड भडकला असून त्याने तैवानवर अनेक निर्बंध लादले आहेत. एवढेच नाही तर चीनच्या लष्कराने तैवानच्या नैऋत्य भागात 21 लष्करी विमाने उडवून आपली ताकद दाखवून दिली. यूएस हाऊसच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी बुधवारी सकाळी तैवानचे अध्यक्ष, त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तैवानला वॉशिंग्टनच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. पेलोसी यांनी सांगितले की, तैवानचे सार्वभौमत्व जपण्याचा अमेरिकेचा निर्धार आहे.

अमेरिकेने तैवानच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे वचन दिले आहे. तैवानची राजधानी तैपेई येथील अध्यक्षीय कार्यालयात त्साई इंग-वेन यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान, पेलोसी यांनी तैवानला समृद्ध देश म्हणून संबोधले. त्यांनी सांगितले की, तैपेईने जगाला हे सिद्ध करून दाखवले आहे की, देशासमोर अनेक आव्हाने असूनही आशा, धैर्य आणि दृढनिश्चय हा शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्य घडवू शकतो. त्या पुढे म्हणाल्या, ‘पूर्वीपेक्षा जास्त आता तैवानशी अमेरिकेची एकता महत्त्वाची आहे, हाच संदेश आम्ही आज देत आहोत.’

त्या म्हणाल्या, ‘तैवानमध्ये आणि जगभरात इतरही लोकशाही टिकवून ठेवण्याचा अमेरिकेचा निर्धार कायम आहे.’ यूएस-तैवान आर्थिक सहकार्याबद्दल पेलोसी म्हणल्या, ‘नवीन यूएस कायद्याचा उद्देश तैवानमधील अमेरिकन उद्योगाला बळकट करणे हा आहे, जो चीनशी स्पर्धा करेल. आमचा हा दौरा मानवी हक्क, अनुचित व्यापार पद्धती, सुरक्षेच्या मुद्द्यांबाबब होता.’

यावेळी तैवानच्या अध्यक्षा त्सी-इंग-वेन म्हणाल्या, ‘आम्ही पेलोसी यांचे तैवानमध्ये स्वागत करतो. येथे येऊन अमेरिका तैवानला किती पाठिंबा देतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. पेलोसी यांनी नेहमी मानवी हक्क आणि लोकशाहीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मी खूप प्रभावित आहे. अमेरिका आणि तैवान यांच्यातील संबंध सुधारत राहतील आणि दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होतील, अशी आशा आहे. अमेरिका आणि तैवान एकत्रितपणे परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देतील जेणेकरून लोकशाही पुन्हा चमकेल.’

पेलोसी यांनी माहिती दिली की, त्यांचा सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपानसह- इंडो-पॅसिफिक दौरा हा, परस्पर सुरक्षा, आर्थिक भागीदारी आणि लोकशाही शासन यावर लक्ष केंद्रित करतो. चीनने मंगळवारी यूएस हाऊस स्पीकरच्या तैवान दौऱ्याला ठामपणे विरोध केला आणि या दौऱ्याला चीन तत्त्वाचे तसेच, दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी केलेल्या संयुक्त संभाषणातील तरतुदींचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा:  'अमेरिकेला भोगावे लागतील परिणाम', नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून चीनचा कडक इशारा)

दरम्यान, तैवान हे दक्षिणपूर्व चीनच्या किनाऱ्यापासून सुमारे 100 मैलांवर स्थित एक बेट आहे. तैवान स्वतःला एक सार्वभौम राष्ट्र मानतो. त्याचे स्वतःचे संविधान आहे. तैवानमध्ये जनतेने निवडून दिलेले सरकार आहे. त्याच वेळी, चीनचे कम्युनिस्ट सरकार तैवानला आपल्या देशाचा भाग असल्याचा दावा करते. चीनला या बेटावर पुन्हा ताबा मिळवायचा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवान आणि चीनच्या एकत्रीकरणाचा जोरदार पुरस्कार केला आहे.