Cameras Installed in Maryam Nawaz's Bathroom in Pak Jail: 'तुरुंगात माझ्या कोठडीत आणि बाथरुम मध्ये होते छुपे कॅमेरे'; मरियम नवाज शरीफ यांचे पंतप्रधान इमरान खान यांच्यावर गंभीर आरोप
Maryam Nawaz & PM Imran Khan (Photo Credits-Instagram/Twitter)

पाकिस्तान (Pakistan) मधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran Khan) यांच्यावर एकामागून एक गंभीर आरोप करण्यात येत आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांची मुलगी मरियम नवाज शरीफ (Maryam Nawaz) यांनी इमरान खान यांच्यावर आरोप केले आहेत. तुरुंगात मला ठेवण्यात आलेल्या कोठडीत आणि बाथरुम मध्ये कॅमेरा लावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

2019 मध्ये चौधरी साखर गिरणी प्रकरणात मरियम यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीत इमरान खान यांनी कॅमेरा लपवून ठेवला होता. अशा प्रकारच्या अनेक कृत्ये त्यांनी केली असल्याचेही मरियम यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर इमरान खान महिलाविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. याचा परिणाम निश्चितच इमरान यांच्या विश्वासार्हतेवर होत आहे. (पाकिस्तान Grey List मध्येच राहणार, FATF चा इमरान खान यांना झटका)

बीबीसी उर्दूशी बोलताना मरियम यांनी सांगितले की, "मी जर पाकिस्तानमध्ये महिलांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल बोलले तर पाकिस्तानचे सरकार आणि अधिकारी आपला चेहरा दाखवू शकणार नाहीत. मला मिळालेल्या वागणूकीवरुन मला रडत बसायचे नाही तर पाकिस्तानमधील कटु सत्य समोर आणायचे आहे. इथल्या जेलमध्ये महिलांचा काय दर्जा जातो, हे सर्वांना दाखवून द्यायचे आहे." त्याचबरोबर महिला पाकिस्तान किंवा इतर कुठेही असो ती कमजोर नसते, असेही त्या म्हणाल्या.

गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे खास सहाय्यक शहजाद अकबर यांनी म्हटले होते की, "मरियम नवाज शरीफ परिवाराने चौधरी साखर मीलच्या पैशांची उधळपट्टी आणि त्यांचे शेअर्स अवैध पद्धतीने ट्रान्सफर केले. 2008 मध्ये 7 मिलियन शेअर्स मरियम नवाझ यांच्याकडे ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर 2010 मध्ये ते शेअर्स युसूफ अब्बास शरीफ यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले."