
फेसबुक (Facebook) सारख्या जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइटचा मुख्य कार्यकारी अधिकारी, अमेरिकन करोडपती मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg), याचा आज वाढदिवस. मार्कचा जन्म 14 मे 1984 रोजी, व्हाईट प्लेन्स, न्यूयॉर्क, अमेरिका इथे झाला. आज मार्कचे नाव संपूर्ण जगात झाले असले तरी, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाला फारसी माहिती नाही. आजच्या घडीला 7,000 कोटी इतके नेट वर्थ असलेल्या मार्कचा थाटही एखाद्या राजासारखाच आहे. म्हणूनच मार्क एकीकडे तंत्रज्ञान आणि दुसरीकडे नाविन्यपूर्ण घरांचा शौकीन आहे. मार्कने गेल्या हिवाळ्यामध्ये ताहो तलावाच्या शेजारी 600 फूट वॉटरफ्रंटसह दोन खाजगी मालमत्ता खरेदी केल्या. तब्बल 59 मिलियन डॉलर इतक्या किमतीला हा सौदा पार पडला. त्यानंतर मार्कच्या इतर मालमत्तांबद्दल चर्चा रंगू लागल्या.

याआधी पालो अल्टो, कॅलिफोर्निया; सॅन फ्रान्सिस्को, आणि कुआई च्या हवाईयन बेटांवर मार्कने मालमत्ता खरेदी केल्या आहेत. सध्या मार्क पालो अल्टो इथल्या 5000 स्केअर फुटच्या घरात राहतो. तिथेच त्याने अजून 4 घरे विकत घेतली आहेत. अशाप्रकारे मार्ककडे एकूण 10 घरे आहेत.
मार्कचे राहते घर, पाच बेडरुम, पाच बाथरूम त्याने मे 2011 मध्ये क्रेशेंट पार्क परिसरात खरेदी केले. घरामध्ये एक मोठे परसदार, स्विमिंग पूल, आणि विस्तृत असे लँडस्केपींग आहे. याच घराच्या जवळ त्याने अजून 4 घरे विकत घेतली आहेत.

मार्कचे सॅन फ्रांसिस्को येथे 5,500 स्क्वेअर फुटाचे टाउनहाऊस आहे. हे घर त्याने 2013 साली, 10 दशलक्ष डॉलर्सना खरेदी केले होते. या घराचे बांधकाम 1928 साली, 9,800 स्क्वेअर फुट जागेवर झाले आहे. खरेदीनंतर त्याने मालमत्तेची पुनर्बांधणी करण्यासाठी 1.6 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले.
गुगल नकाशानुसार, हे घर नोएल व्हॅली आणि मिशन जिल्हा परिसर दरम्यान, डोलोरस हाइट्स येथील 21 व्या रस्त्यावर आहे.

2014 मध्ये मार्कने कुआई बेटांवर 100 दशलक्ष डॉलर्सना दोन घरे खरेदी केले. एका निवांत समुद्रकिनाऱ्यावरील तब्बल 750 एकर (300 हेक्टर) जागेवर ही घरे बांधली आहेत. 2017 मध्ये त्याने पिला'ए बीचवर अजून एक घर खरेदी केले. आश्चर्यम्हणजे याच घरांच्या समोर तब्बल 357 एकर परिसरात झुकरबर्गची शेती आहे. ऊस, आलं, हळद आणि पपई अशी पिके इथे घेतली जातात.

झुकरबर्गची ब्रशवूड इस्टेट ही 6 एकर जागेवर पसरली आहे. या घरात 6 बेडरूम आणि 5 बाथरूम्स आहेत. त्यानंतर त्याने आठ बेडरूम आणि नऊ बाथरुम असलेली कॅरोलेल इस्टेटही खरेदी केली.


ताहो तलावाच्या शेजारी खरेदी केलेल्या या दोन घरांच्या मधोमध 600 फुट तलाव आहे. खास आपल्या पतींच्या सांगण्यावरून सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी मार्कने ही घरे खरेदी केली आहेत. मार्कच्या पत्नीचे नाव प्रिस्किला चॅन (Priscilla Chan) असून, फेसबुकचे निर्मिती आणि त्याच्या विकासामध्ये तिचा फार मोठा हात आहे.