पाकिस्तान (Pakistan) त्याच्या अनेक चुकीच्या कृत्यांबद्दल जगभरात प्रसिद्ध आहे. कधी तो भारताविरूद्ध दहशतवादी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करतो तर कधी इतर कोणत्या देशाविरूद्ध कट रचतो. आता सामर्थ्यवान देशांसमोर खराब झालेली आपली प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांना आंबे पाठवत आहे. मात्र, पाकिस्तानची ही मॅंगो डिप्लोमसी (Mango Diplomacy) पूर्णतः अपयशी ठरली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने (एफओ) बुधवारी अमेरिका आणि चीनसह 32 हून अधिक देशांच्या प्रमुखांना भेट म्हणून आंबे पाठवले. परंतु अमेरिका आणि चीनसारख्या देशांनी पाकिस्तानची ही भेटवस्तू नाकारली.
या अहवालानुसार पाकिस्तानचे अध्यक्ष डॉ. आरिफ अल्वी यांच्या वतीने 'चौंसा' आंबा 32 देशांच्या राज्य प्रमुख व सरकारकडे पाठविला गेला. या आंब्याच्या पेट्या इराण, आखाती देश, तुर्की, ब्रिटन, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि रशिया येथेही पाठविल्या जातील. सूत्रांनी म्हटले आहे की एफओने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाही आंबा पाठविण्याच्या यादीमध्ये समाविष्ट केले होते, परंतु पॅरिसने यासंदर्भात पाकिस्तानला कोणतेही उत्तर दिले नाही.
अहवालानुसार पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडून भेट न स्वीकारल्याबद्दल ज्या देशांनी दिलगिरी व्यक्त केली आहे अशा देशांमध्ये चीन, अमेरिका, कॅनडा, नेपाळ, इजिप्त आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. या मागे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेले नियम हे कारण देण्यात आले आहे. यापूर्वी 'अन्वर रत्तोल' आणि 'सिंधारी' हा आंबा इतर देशांना पाठवला गेला होता, मात्र आता हे दोन्ही आंबे काढून टाकण्यात आले आहेत. (हेही वाचा: काय सांगता? Pakistan च्या अर्थव्यवस्थेला चक्क गाढवांमुळे चालना; Donkey लोकसंख्या पोहोचली 56 लाखावर)
दरम्यान, पाकिस्तानच्या 'मॅंगो डिप्लोमसी' चा चीनशी विशेष संबंध आहे. 1960 च्या दशकात जेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मियां अरशद हुसेन यांनी माओत्से तुंग यांना आंबे सादर केले, तेव्हा उन्हाळ्यातील फळांच्या पेट्यांची देवाणघेवाण करून दोन्ही देशांनी आपले संबंध मजबूत केले होते.