
अनेक उलथापालथी आणि नाट्यमय घडामोडींनतर अखेर मालदीवमधील राजकीय नाट्यावर पडदा पडला. राष्ट्रपतीपदाची निवडणूक होऊ घातल्यामुळे तेथील राजकीय हवा गेले काही महिने तापली होती. संपूर्ण देश आणि जगाचेही लक्ष लागून राहिलेली ही निवडणूक अखेर पार पडली. या निवडणुकीचा निकाल रविवारी लागला. यात विद्यमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांचा परवाभव करत इब्राहीम मोहम्मद सोलिह विजयी झाले. विशेष असे की, इब्राहीम मोहम्मद सोलिह कोणत्याही पक्षाशी संलग्न नव्हते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती. मालदीवच्या जनतेने अपक्ष उमेदवारावर विश्वास दाखवला. इब्राहीम मोहम्मद विजयी झाले.
इब्राहिम सोलिह यांचे सत्तेवर येणे हे भारत आणि मालदीव यांच्या परराष्ट्र धोरणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण, इब्राहिम सोलिह हे मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध मैत्रीपूर्ण आणि तितकेच दृढ असावेत या विचारांचे आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, झालेल्या एकूण मतदानापैकी (९२ टक्के) सोलिह यांना तब्बल ५८.३ टक्के मते मिळाली आहेत. ट्रान्सपरेन्सी मालदीव या स्वायत्त संस्थेने सोलिह यांनी निर्णायक विजय मिळवल्याचे म्हटले आहे. ट्रान्सपरेन्सी मालदीव ही संस्था देशातील निवडणूक प्रक्रियेचे निरिक्षण करते.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना सोलिह यांनी म्हटले आहे की, हा जनतेचा विजय आहे. जनतेचा कौल बघून मला प्रचंड आनंद झाला आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. यापुढे देशातील सत्ता हस्तांतरण शांततेच्या मार्गाने होईल, अशी आशाही त्यांनी प्रतिक्रियेदरम्यान व्यक्त केली.