प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीमुळे बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. सध्या, विषाणूपासून बचाव करण्यासाठी विविध कार्यक्रमांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. लग्नसोहळा ही त्यातलीच एक गोष्ट. कोरोना व्हायरसमुळे लग्नसमारंभ साजरे करण्याचे प्रकारही बदलले आहेत. लग्नांमध्ये पाहुण्यांची संख्या कमी ठेऊन ते आनंदाने साजरे करण्यासाठी अनेक ट्रिक्स वापरल्या जात आहेत. असेच एक लग्न मलेशियात (Malaysia) पाहायला मिळाले. मलेशियामध्ये लग्नासाठी 20 पाहुण्यांची उपस्थिती अनिवार्य केली गेली आहे. मात्र राजधानी क्वालालंपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका लग्नात कोविड-19 चे नियम पाळून तब्बल 10,000 हून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली.

हे लग्न होते प्रभावशाली नेते आणि कॅबिनेट मंत्री टेंगकू अदनान (Tengku Adnan) यांच्या मुलाचे. पुत्रजयाच्या प्रचंड सरकारी भवनमध्ये हे ग्रँड मॅरेज पार पडले. तर या लग्नाला दहा हजार लोक उपस्थित राहूनही कोरोना व्हायरसचे नियम मोडले गेले नाहीत, असे कसे शक्य आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. या लग्नामध्ये पाहुण्यांना भेटण्यासाठी एक भन्नाट आयडिया वापरली गेली होती. हे लग्न ड्राईव्ह-थ्रू लग्न होते. म्हणजेच रविवारी सकाळी नवीन जोडपे, वर टेंगकू मुहम्मद हाफिज आणि वधू ओसिन अलागिया राजधानी क्वालालंपूरच्या दक्षिणेस, पुत्रजयाच्या एका भव्य सरकारी इमारतीच्या बाहेर बसले होते. (हेही वाचा: 31 डिसेंबर पर्यंत युके मधून भारतामध्ये येणारी सारी विमानं New Mutant of Coronavirus भीतीच्या पार्श्वभूमीवर रद्द)

या लग्नाला हजेरी लावणारे 10,000 लोक एका रांगेत आपापल्या कारमधून येत होते. गाडीच्या बंद काचांमधूनच वधू वराला हात हालवून हेलो म्हणून, त्यांना शुभेच्छा देऊन ते जात होते. यावेळी सामाजिक अंतराचे पालन होईल याची पूर्ण काळजी घेतली गेली होती. याबाबत टेंगकू अदनान म्हणाले, ‘सकाळी मला 10 हजार पाहुण्यांच्या आगमनाची माहिती मिळाली. पाहुण्यांचा उत्साह पाहून हा मी माझ्या कुटुंबाचा एक मोठा सन्मान असल्याचे आम्हाला भासले. याबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो.’ 10 हजार कारच्या ताफ्यास लग्नाच्या ठिकाणाहून पुढे जाण्यास सुमारे तीन तास लागले. गाडीतच लोकांना जेवणाची पाकिटे वाटली गेली.