शेजारील देश पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. खाद्यपदार्थांपासून ते इंधनापर्यंतचे संकट अधिक गडद झाले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोक सिलिंडरमध्ये भरलेला एलपीजी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून वापरत आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानमधील सर्वाधिक गॅस उत्पादक प्रांत असलेल्या खैबर पख्तुनख्वामधील त्रस्त लोक पिशव्यांमध्ये गॅस भरून अन्न शिजवत आहेत.
मात्र, अशा प्रकारे गॅस वापरणे म्हणजे वॉकिंग बॉम्ब वाहून नेण्यासारखे आहे. हे अतिशय धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या पाकिस्तानमध्ये 10 हजार पाकिस्तानी रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध आहे. महागाई आणि आर्थिक चणचण यांमुळे तो विकत घेणे सर्वांनाच परवडेल असे नाही. दुसरीकडे, एलपीजी गॅस प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये 500 ते 900 रुपयांना मिळतो. सोयीनुसार वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्यांमध्येही हा गॅस उपलब्ध आहे.
पाकिस्तान में अर्थव्यवस्था चरमरा गई है, LPG का आया संकट
◆ लोग प्लास्टिक बैग में रसोई गैस भर रहे हैं
Pakistan | #Pakistan pic.twitter.com/8St2wbHRdn
— News24 (@news24tvchannel) January 1, 2023
हा गॅस भरण्यासाठी वापरलेला कंप्रेसरही केवळ 1500 ते 2000 रुपयांना मिळतो. त्यामुळे अनेक नागरिक असा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेला गॅस वापरत आहेत. मात्र यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, असे तज्ञांचे मत आहे. पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी सोशल मीडियावर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये स्वयंपाकाचा गॅस घेऊन जाणाऱ्या लोकांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांमधून गॅस घेऊन जाणारे लोक वॉकिंग बॉम्बपेक्षा कमी नाहीत, असेही त्यांनी लिहिले आहे. (हेही वाचा: चीनपाठोपाठ जपानमध्येही कोरोनाचा कहर; कोविडमुळे मृतांचा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 पटीने अधिक)
पेशावर शहरातील अधिकाऱ्यांनी अशा पिशव्या विकल्याबद्दल या महिन्यात 16 दुकानदारांना अटक केली आहे. कारवाईनंतर या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक भूमिगत झाले आहेत. दंड व अटकेच्या भीतीने दुकानदार आता खुलेआम गॅस भरलेल्या पिशव्या विकणे टाळत असले तरी हा धंदा सुरूच आहे.