Coronavirus: स्पेन व दुबईमध्ये लॉक डाऊनचे नियम शिथिल; सरकारच्या नियमांचे पालन करून येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी दोन्ही देश सज्ज
स्पेन व दुबई (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर सुरु झाल्यापासून जवळजवळ 3 महिने अनेक देशांमध्ये लॉक डाऊन (Lockdown) होते. यामुळे भारतासह अनेक देशांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. आता कोरोनाच्या प्रकरणांची संख्या कमी झाल्यावर हळू हळू राष्ट्रे पूर्वपदावर येत आहेत. आता लॉक डाऊनचे नियम शिथिल झाल्यावर, कोरोनामुळे एकेकाळी सर्वात प्रभावित देशांपैकी एक असलेल्या स्पेनने (Spain) आपल्या अंतरराष्ट्रीय सीमा उघडल्या आहेत. पर्यटनाला (Tourism) चालना देण्यासाठी स्पेनने आता पर्यटकांना आपल्या देशात येण्याची अनुमती दिली आहे. दुसरीकडे दुबईनेही (Dubai) असा निर्णय घेत, 7 जुलैपासून लोकांना आपल्या देशात येण्याची परवानगी दिली आहे..

स्पेन सहसा वर्षाकाठी आठ दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करते. देशातील जीडीपीच्या 12% पेक्षा जास्त मदत पर्यटनाद्वारे मिळते. उन्हाळा संपण्यापूर्वी पुन्हा एकदा पर्यटन व्यवसाय सुरु करणे स्पेनच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे मानले जात आहे. यासाठी स्पेन सरकारने पर्यटकांसाठी काही नियम घालून दिले आहेत. द्शात आल्यावर विमानतळावर सर्व प्रवाश्यांची थर्मल तपासणी केली जाईल. युरोपियन युनियन व शेंजेन झोनच्या देशातील पर्यटक येथे येऊ शकतील. सर्व पर्यटकांना मास्क घालणे आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. (हेही वाचा: यंदा हज यात्रा सौदी अरेबिया मध्ये मर्यादित उपस्थितीत पार पडणार; भारतीय भाविकांना मात्र परवानगी नाही)

कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये पर्यटकांना येण्यास मनाई केली. परंतु आता जेव्हा जगभरात कोरोना बाबतचे नियम आणि कायदे शिथिल केले जात आहेत, त्याचवेळी दुबई पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. प्रवाश्यांसाठी सरकारने एक प्रोटोकॉल यादीही जाहीर केली आहे, जी सर्वांसाठी अनिवार्य असेल. तसेच, पर्यटकांना अलीकडील कोरोना नकारात्मक प्रमाणपत्र सादर करावे लागेल किंवा दुबई विमानतळावर कोरोनाची चाचणी करून घ्यावी लागेल.  दुबईच्या ट्रीपच्या 96 तास आधी कोरोना विषाणूची तपासणी करणे देखील बंधनकारक केले आहे.