दुबईचा राजा हरला तीन वर्षांपासून चालू असलेली पूर्व पत्नीसोबतची लढाई; गमवावा लागला मुलांचा ताबा
दुबईचे पंप्रधान आणि हया (Photo Credit : Facebook)

दुबईचे (Dubai) शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल-मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid al-Maktoum) हे त्यांच्या पूर्व पत्नीविरुद्ध चालू असलेली आपल्या मुलांच्या कस्टडीबाबतची तीन वर्षांची कायदेशीर लढाई हरले आहेत. शेख यांच्यावर पत्नीने अपहरण, जीवे मारण्याच्या धमक्या, ब्लॅकमेल, हेरगिरी आणि फोन हॅकिंगचे आरोप केले होते. त्यांची पूर्व पत्नी राजकुमारी हया बिंत अल-हुसेन (Princess Haya bint Hussein) ही जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची सावत्र बहीण आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आपल्या दोन्ही मुलांचा ताबा राजकुमारी हया बिंत अल-हुसेन यांना मिळाला आहे. त्यांची मुलगी अल जलिला 14 वर्षांची आहे आणि मुलगा झायेद 10 वर्षांचा आहे.

ब्रिटनच्या वरिष्ठ न्यायमूर्तींनी गुरुवारी या प्रकरणाचा निकाल दिला. शेख मोहम्मदने आपल्या पत्नीवर अत्याधिक कौटुंबिक अत्याचार केल्याचा निर्णय त्यांनी दिला. दुबईचा शासक आणि राजकुमारी हया यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली होती. दोघांना दोन मुले आहेत. शेख मोहम्मदने 2019 मध्ये हयाला घटस्फोट दिला. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, शेख लतीफाहबद्दल अस्वस्थ करणाऱ्या बातम्या मीडियामध्ये आल्यावर हया जर्मनीला आश्रय घेण्यासाठी पळून गेली. लतीफा ही शेख मोहम्मद यांची अजून एक मुलगी आहे.

दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल-मकतूम आणि त्यांची धाकटी पत्नी राजकुमारी हया यांचा घटस्फोट हा ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता. राजकुमारी हयाने केलेल्या आरोपांच्याव्यतिरिक्त, तिच्यावर अंगरक्षकासोबत अवैध शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोप होता. तिने या अंगरक्षकाला गप्प करण्यासाठी, आपल्या 10 वर्षांच्या मुलीच्या खात्यातून $7.5 दशलक्ष काढले होते. (हेही वाचा: दुबईच्या राजाने दिला आपल्या सहाव्या पत्नीला घटस्फोट; तब्बल 5,500 कोटी रुपयांमध्ये झाली सेटलमेंट)

मे 2019 मध्ये लंडन हायकोर्टाने दोन्ही मुलांच्या कस्टडीबाबत कार्यवाही सुरू केली. द गार्डियन मधील एका वृत्तानुसार, हायकोर्टाला 2020 मध्ये आढळले की शेख मोहम्मदने शेख लतीफासह स्वतःच्या दोन मुलांचे अपहरण करण्याचा कट रचला होता. यासोबतच त्याने 2018 च्या अखेरीपासून राजकुमारी हयाला त्रास देण्यासाठी, धमकावण्याचे विविध डावपेच अवलंबले होते. त्यानंतर आता न्यायालयाने मोठा निर्णय देत दोन्ही मुलांची कस्टडी राजकुमारी हयाला सोपवली आहे.