Joe Biden On Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोडले मौन; सैन्य माघारीवर ठाम
US President Joe Biden (Photo Credits: IANS)

अफगानिस्तान (Afghanistan) मधून अमेरिकी सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान्यांनी घेतलेल्या या देशावरील कब्जानंतर तेथील विदारक परिस्थितीचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden)  यांनी देखील यावर पहिल्यांदाच भाष्य करत अमेरिकेने सैन्य मागे घेतल्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केले आहे. तसेच अफगानिस्तान मधील अराजकता ही अमेरिकेमुळे नव्हे तर स्थानिक नेत्यांमुळे माजली असल्याचं सांगितले आहे. या युद्धजन्य परिस्थितीची आम्ही अपेक्षा केली होती पण आमच्या अपेक्षेआधीच ती उद्भवली असल्याचंही जो बायडन यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मधून संबोधित करताना जो बायडन यांनी अफगाणी नेते लढायचं सोडून पळून गेले त्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे म्हणाले आहेत. अफगानिस्तान मध्ये 20 वर्ष अमेरिकन सैन्य आहे. आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तेथून अमेरिकी सैन्य मागे घेण्याची यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही असे देखील जो बायडन यांनी स्पष्ट करत आपल्या निर्णयावर ठाम राहताना अफगानिस्तान मधील अमेरिकन लोकांना मायदेशी सुखरूप आणले जाईल तसेच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास जसाच तसे उत्तर दिले जाईल असा देखील इशारा देण्यात आला आहे. Afghanistan Crisis: आफगाणिस्तान मध्ये तालिबानींचा वाढता कब्जा पाहता Kabul Airport वर नागरिकांच्या तोबा गर्दीचं भयावह दृश्य (Watch Video).

अफगाणिस्तानमधील आमचे ध्येय कधीही राष्ट्रनिर्मिती किंवा लोकशाही निर्माण करणे असे नव्हते. अफगाणिस्तानमध्ये आमचे एकमेव राष्ट्रीय हित आजही कायम आहे जे नेहमीच अमेरिकन मातृभूमीवर दहशतवादी हल्ला रोखणे हेच असेल असेदेखील बायडन यांनी स्पष्ट केले आहे.

रविवार, 15 ऑगस्टला तालिबान्यांनी काबूल मध्ये प्रवेश करत राष्ट्रपती भवनावर कब्जा केला त्यानंतर अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घानी यांनी देश सोडला. मग हळूहळू तेथील स्थानिक परिस्थिती चिघळत जात आहे. दरम्यान मागील काही दिवस जो बायडन कुटुंबासोबत सुट्टीवर होते. काबूल मधील परिस्थिती समोर येताच ते कार्यालयात परतले आणि त्यांनी अफगानिस्तान मधील परिस्थितीवर आपली भूमिका काही तासांपूर्वी व्हाईट हाऊस मधून मांडली आहे.

जो बायडन यांच्या निर्णयावरून त्यांच्यावर टीका होत आहे पण ते या निर्णयावर ठाम आहेत. सध्या काबूल विमानतळाच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे काही सैनिक अफगानिस्तानमध्ये तैनात आहेत. अनेक देशांनी आपल्या राजनैतिक अधिकारी मायदेशी परत बोलावले आहेत. भारताकडूनही अफगानिस्तान मधील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.