जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरुच आहे. या भयंकर संकटावर मात करण्यासाठी जगभरातील सर्वच राष्ट्र प्रयत्नशील आहेत. कोरोना व्हायरसवर उपाय शोधण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन (Hydroxychloroquine) या अॅंडी मलेरीया ड्रगचा वापर केला जात आहे. त्यामुळे जगभरात याची मागणी वाढली आहे. अमेरिके पाठोपाठ इस्त्राईल देशालाही हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा पुरवठा केल्याने इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यासाठी त्यांनी खास ट्विट केले आहे.
"इस्त्राईलला हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन पाठवल्याने मी तुमचा आभारी आहे. थॅंक्यू माय डिअर फ्रेंड, नरेंद्र मोदी," असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच इस्त्राईलच्या सर्व नागरिक देखील तुमचे आभारी आहेत, असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. यापूर्वी ब्राझील राष्ट्राध्यक्ष Jair Bolsonaro यांनी Hydroxychloroquine ची मदत भारताकडे मागितली होती आणि भारताकडून मिळालेल्या मदतीसाठी आभारही मानले होते.
PM of Israel Tweet:
Thank you, my dear friend @narendramodi, Prime Minister of India, for sending Chloroquine to Israel.
All the citizens of Israel thank you! 🇮🇱🇮🇳 pic.twitter.com/HdASKYzcK4
— PM of Israel (@IsraeliPM) April 9, 2020
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील Hydroxychloroquine ची मागणी केली होती. त्यानंतर भारताकडून अमेरिकेला Hydroxychloroquine चा पुरवठा करण्यात आला. या महत्त्वपूर्ण मदतीबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे भरभरुन कौतूक केले आणि संकटात भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही, अशा भावना व्यक्त केल्या. त्यावर प्रतिक्रीया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "हे संकट अमेरिका-भारत संबंध अधिक दृढ करेल. तसंच या संकट काळात शक्य ती मदत माणूसकीच्या नात्याने भारताकडून जगाला केली जाईल."