Israeli: गे खासदार आमिर ओहाना यांचा बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रिमंडळात समावेश, कायदा मंत्रालय सांभाळणार
Amir Ohana | (Photo Credits: Facebook)

इस्राईल (Israeli) चे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या मंत्रिमंडळात आता गे (Gay ) खासदारालाही संधी देण्यात आली आहे. आमिर ओहाना असे या खासदाराचे नाव आहे. आमिर ओहाना (Amir Ohana) हे नेतन्याहू यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय कायदा मंत्री कारभार सांभाळणार आहेत. ओहाना हे इस्राईल देशाच्या इतिसाहातील पहिलेच असे मंत्री आहेत ज्यांनी आपल्या समलैंगिक असण्याचा जाहीर स्वीकार केला आहे. इस्राईल आपला वार्षिक गे प्राइड उत्साह साजरा करत असताना नेतन्याहू यांच्या दक्षिणपंथी लिकुड पार्टी कडून ओहाना यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

इस्राईलच्या पंतप्रधान कार्यालयाने या निवडीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'आमिर ओहाना हे कायदा आणि न्याय याचे जाणकार आणि गाढे अभ्यासक आहेत.' दरम्यान, नेतन्याहू यांनी आयलत शाकेद यांना पायउतार केल्यानंतर त्यांच्या जागी आमिर ओहाना यांची निवड केली आहे. नेतन्याहू यांनी शाकेद आणि शिक्षण मंत्री नफताली बेनेट यांना रविवारी पायउतार केले होते.

पंतप्रधान कार्यालयाने आमिर ओहाना यांची नियुक्ती ऐतिहासिक असल्याचे सांगत म्हटले आहे की, इस्राईलच्या इतिहासात पहिल्यांदाच एलजीबीटीक्यू समुदायातील सदस्यास हा दर्जा मिळाला आहे. न्याय आणि समानतेच्या दृष्टीने टाकलेलेल हे ऐतिहासिक पाऊल आहे. नेतन्याहू यांच्या यांच्या मंत्रिमंडळात येत्या काही दिवसात आणखी काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओहाना यांची मंत्रिमंडळात नियुक्ती होताच नेतन्याहू यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. (हेही वाचा, भारताची Trans Beauty Queen वीणा सेंद्रे करणार इंटरनॅशनल ट्रन्स क्विन कॉन्टेस्टमध्ये देशाचे प्रतिनिधित्व)

दरम्यान, आमिर ओहाना यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल भावनिक संदेश जारी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'एक ज्यू म्हणून एक वकील, मानवतावादी आणि समानतेच्या सिद्धांतावर विश्वास ठेवण्याच्या या निर्णयावर आज मला फार आनंद होतो आहे. 2 मुलांचा वडील आणि एक प्रेम करणाऱ्या सहकाऱ्याच्या पातळीवर देशाचे नागरिक आणि देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या प्रति सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा प्रयत्न करु.'