Airstrike प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Israel Attack Lebanon: लेबनॉन (Lebanon) च्या उत्तर बेरूत (North Beirut) येथे रविवारी इस्त्रायली हवाई हल्ल्यात (Israeli Airstrikes) किमान 20 लोक ठार झाले. लेबनीज आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात पुष्टी केली. मंत्रालयाने म्हटले आहे की, इस्रायलने बेरूतच्या उत्तरेकडील आलमत गावाला लक्ष्य केले. इस्रायली सैन्याने उत्तर बेरूतमध्ये हवाई हल्ले केले. यात 20 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर या हल्ल्यात सहा जण जखमी झाले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात हवाई हल्ले झाले त्या भागात हिजबुल्लाचे मोठे अस्तित्व आहे. सध्या या हल्ल्यांबाबत इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच -

याआधी शनिवारी इस्रायली हवाई हल्ल्याने गाझाच्या उत्तरेकडील जबलिया येथील निर्वासितांच्या छावणीला लक्ष्य केले. ज्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. गाझा सिटीच्या अल-अहली रुग्णालयाचे संचालक डॉ. फडल नईम यांनी सांगितले की, मृतांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्याचवेळी इस्रायलने सांगितले की, त्यांनी जबलियामध्ये 'दहशतवादी' सक्रिय असलेल्या लपण्याचे ठिकाण ओळखले आहे. मात्र, इस्रायली लष्कराने याचा कोणताही पुरावा शेअर केलेला नाही. (हेही वाचा -Israel-Hamas War: उत्तर गाझामध्ये आयडीएफ हवाई हल्ल्यात 20 ठार; पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली माहिती)

दरम्यान, रविवारी आणखी एका हल्ल्यात गाझा शहरातील एका घराला लक्ष्य करण्यात आले. ज्यामध्ये हमास संचालित सरकारचे मंत्री वेल अल-खर, त्यांची पत्नी आणि तीन मुले मारली गेली. गेल्या महिनाभरात, इस्रायली सैन्याने गाझामधील जबलिया आणि त्याच्या आसपासच्या भागांना पूर्णपणे वेढा घातला आहे. 6 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या संघर्षात शेकडो लोक मारले गेले आहेत. तसेच हजारो लोकांना गाझा शहरात आश्रय घ्यावा लागला आहे. (हेही वाचा - Israeli Airstrikes Target Iran's Missile Production: इराणच्या क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांवर इस्रायली हवाई हल्ले, नव्या उपग्रह छायाचित्रांचा खुलासा)

तत्पूर्वी, संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांच्या गटांनी शुक्रवारी इशारा दिला होता की, उत्तर गाझामध्ये दुष्काळाचे संकट वाढू शकते आणि तेथील लोकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी शनिवारी चेतावणी दिली की, तात्काळ मदत न दिल्यास उत्तर गाझामधील लोकांना उपासमारीचा सामना करावा लागू शकतो.