Representative Image (संग्रहित संपादित प्रतिमा)

गाझा (Gaza) येथील हमासद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी इस्रायली सैन्याच्या (Israeli Military) हल्ल्यात झालेल्या दुर्घटनेची माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की आजच्या हवाई हल्ल्यात 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ठार झालेल्यांमध्ये 12 महिला आणि 8 मुले आहेत, तर 50 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम अजूनही चालू आहे. बचाव कामात व्यस्त असलेले कामगार अजूनही या हल्ल्यात वाचलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. अशाप्रकारे एक आठवड्यापूर्वी सुरू झालेल्या या हिंसाचारात गाझामधील मृतांची संख्या 181 वर पोहोचली आहे.

दुसरीकडे इस्त्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ताज्या हल्ल्यात त्यांच्याकडे दोन मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री इस्रायलच्या दक्षिणेकडील अनेक शहरांवर रॉकेट हल्ले झाले आहेत. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या हल्ल्यात हमासने गाझापासून इस्त्रायली हद्दीत आतापर्यंतचे सर्वाधिक रॉकेट उडवले आहेत. मेजर जनरल ओरी गोर्डिन यांनी पत्रकारांना सांगितले की सोमवारपासून हमासने इस्राईलच्या दिशेने सुमारे 3,000 रॉकेट उडवले आहेत. ते म्हणाले की गाझा येथून ज्या वेगाने रॉकेट्स सोडण्यात आले आहेत, ते गाझाच्या पूर्वीच्या हल्ल्यांपेक्षा आणि 2006 साली लेबनॉनच्या हिज्बुल्लाहने केलेल्या हल्ल्यांपेक्षा जास्त आहे.

इस्राईल आणि गाझामधील हमास दरम्यान सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे प्रयत्न चालू आहेत. इस्रायलचे अमेरिकन राजदूत हैदी अमर यांनी इस्त्रायली संरक्षण मंत्री बेनी गॅन्ट्झ आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. दुसरीकडे इजिप्तनेही दोन्ही बाजूंच्या संघर्षविरामांसाठी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. (हेही वाचा: इजराइल लष्कराने गाझा सीमेवर पाठवले 9,000 सैनिक, हमासवर 40 मिनीटात डागली 450 क्षेपणास्त्र)

दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या लढाईत रविवारी संध्याकाळपर्यंत 181 लोक मरण पावले आहेत. यात 47 मुले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये 10 इस्त्रायली आणि उर्वरित 171 पॅलेस्टाईन यांचा समावेश आहे. या युद्धात आतापर्यंत 1200 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.