Iraq fire

इराकमध्ये एक लग्नसोहळा सुरू असताना अचानक एका हॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वधू वरासह जवळपास 100 हून अधिक वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला तर 150 हून अधिक लोक जखमी असल्याची प्राथामिक माहिती आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती सध्या गंभीर आहे. उत्तर इराकच्या (Iraq)  के नेवेहमधील (Nineveh) अल-हमदानिया भागात ही दुर्घटना घडली आहे. नेवेह प्रांत मोसुलच्या बाहेर राजधानी बगदादपासून जवळपास 335 किलोमीटर अंतरावर आहे. या भीषण आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र फटाके पेटवल्यानंतर आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे.  (हेही वाचा - Hardeep Singh Nijjar ची हत्या हा Coordinated Attack असल्याचं CCTV फूटेज मध्ये दिसतय - The Washington Post चा दावा)

इराकी वृत्तसंस्था नीनाच्या हवाल्यानुसार विवाहस्थळी असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका झाला आहे. इराकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका उडाला. तसेच हॉलच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य सुमार दर्जाचे असल्याने  काही मिनिटातच आगीमुळे हॉलचा काही भाग कोसळला.त्यामुळे 100 हून अधिक वऱ्हाडी होरपळले. यामध्ये वधू आणि वराचा देखील समावेश आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

इमारतीला आग स्थानिक वेळेनुसार 10:45 च्या सुमारास लागली. त्यावेळी शेकडो लोक लग्नमंडपात लग्नसोहळा साजरा करत होते. अधिकृत निवेदनानुसार इराकी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके पाठवली आहेत.तसेच जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी अधिकाऱ्यांना या दुर्दैवी घटनेमुळे जखमी झालेल्या लोकांना मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहे.