American Dollar (PC - Pixabay)

भारतीय कंपन्या अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक (Investment) करत रोजगार निर्मिती करत आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 163 भारतीय कंपन्यांनी 40 अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे देशात सुमारे 4,25,000 नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. एका सर्वेक्षणात हे तथ्य समोर आले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या 'इंडियन रूट्स, अमेरिकन सॉईल' शीर्षकाचे हे सर्वेक्षण बुधवारी अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी प्रसिद्ध केले. भारतातील अमेरिकेचे पदसिद्ध राजदूत एरिक गार्सेटी हेही यावेळी उपस्थित होते.

अहवालात असे म्हटले आहे की, भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवर सुमारे $185 दशलक्ष खर्च केले आहेत. यूएस-आधारित संशोधन आणि विकास प्रकल्पांमध्ये त्यांचा निधी सुमारे एक अब्ज डॉलर्स आहे. भारतीय कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना संधू म्हणाले, “भारतीय कंपन्या अमेरिकेत सामर्थ्य, लढण्याची भावना आणि स्पर्धात्मकता आणत आहेत. ते रोजगार निर्माण करत आहेत आणि स्थानिक समुदायांना आधार देत आहेत.’

सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी म्हणाले, ‘भारतीय कंपन्यांनी अमेरिकन बाजारपेठेत त्यांची लढाऊ क्षमता आणि वचनबद्धता दाखवून दिली आहे. गुंतवणुकीत वाढ करण्याबरोबरच त्यांनी रोजगारही निर्माण केला असून विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली आहे.’ (हेही वाचा: पाकिस्तानच्या महागाईने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड; पोहोचला 36.4 टक्क्यांच्या उच्चांकावर, श्रीलंकेला टाकले मागे)

भारतीय कंपन्यांद्वारे सर्वाधिक रोजगार मिळालेल्या राज्यांमध्ये टेक्सास (20,906 नोकऱ्या), न्यूयॉर्क (19,162 नोकऱ्या), न्यू जर्सी (17,713 नोकऱ्या), वॉशिंग्टन (14,525 नोकऱ्या), फ्लोरिडा (14,418 नोकऱ्या), कॅलिफोर्निया (14,334 नोकऱ्या), जॉर्जिया (13,945 नोकऱ्या), ओहायो (12,188 नोकऱ्या), मोंटाना (9,603 नोकऱ्या), इलिनॉय (8,454 नोकऱ्या) यांचा समावेश आहे. भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत दूरस्थपणेही (Remotely) अनेक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. अशा नोकऱ्यांची संख्या सुमारे 35,000 आहे.