इम्रान खान (Photo Credit : Youtube)

अखेर भारताने ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवले. या गोष्टीचे पडसाद पाकिस्तानमध्ये (Pakistan)  फार वेगळ्या पद्धतीने उमटले. पाकिस्तानने या गोष्टीचा निषेध करत भारतासोबतचे व्यापार संबंध तोडून टाकले. मात्र आता याचा तोटा त्यांनाच होत आहे. मुस्लिम बांधव आज जगभरात बकरी ईदचा (Bakra Eid) सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. मात्र पाकिस्तानमध्ये महागाईचा दर आकाशाला भिडला असल्याने लोकांमध्ये सणाचा अजिबात उत्साह दिसून येत नाही.

पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार संबंध तोडले, रेल्वे-बस सेवा रद्द करण्यात आली. यामुळे भारताकडून आयात होणाऱ्या कांदा, टोमॅटो सारख्या महत्वाच्या गोष्टी बंद झाल्या आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये महागाई फार वाढली आहे, लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. तसेच दूध, भाज्या, मांस यांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने आज इतका मोठा सण साजरा करण्याचा उत्साह लोकांमध्ये अजिबात नाही. (हेही वाचा: कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने सुरु केले घाणेरडे राजकारण; मुद्दाम थांबवली समझौता एक्सप्रेस)

पाकिस्तानने व्यापार बंदीचा निर्णय घेतल्याने देशात आर्थिक मंदिच्याही झळा जाणवू लागल्या आहेत. त्यात लग्नकाळ संपल्यानंतर लगेचच मुहर्रमची सुरुवात होणार आहे. त्यावेळीही अशीच परिस्थिती राहिली तर पाकिस्तानमधील जवळजवळ प्रत्येक सणाला गालबोट लागणार आहे. अशाप्रकारे सध्याच्या काळात पाकिस्तान सरकारने घेतलेला हा निर्णय पूर्णतः चुकीचा असल्याचे मत नागरिकांनी आणि अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याआधीही पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत मधील व्योर सबंध असेच बिघडले होते. त्यावेळीही पाकिस्तानमधील महागाई प्रचंड वाढली होती. आता स्वतःच्या हाताने पाकिस्तानने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.