कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने सुरु केले घाणेरडे राजकारण; मुद्दाम थांबवली समझौता एक्सप्रेस
Representational Image (Photo Credits: PTI)

मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कलम 370 आणि 35 A हटवले. या गोष्टीवर देशभरातून अनेक सकारात्मक प्रक्रिया उमटल्या. मात्र या निर्णयाचा पाकिस्तानला (Pakistan) फार मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानने आपल्या पद्धतीने याबाबतचा निषेध व्यक्त करण्यात सुरुवातही केली आहे. भारतासोबतचे व्यापारसंबंध तोडले, हवाई हद्द बंद केली. आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने ‘समझौता एक्सप्रेस’ (Samjhauta Express) थांबवली आहे. दिल्ली आणि लाहोर यादरम्यान समझौता एक्सप्रेस चालवली जाते, जिच्यावर पाकिस्तानने रोक लावली आहे.

पाकिस्तानी मिडीयाने याबाबत वृत्त दिले आहे. या रेल्वेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी भारतीय सीमारेषेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने नाईलाजाने ही रेल्वे थांबवावी लागली आहे. त्यानंतर आता अमृतसर वरून भारतीय लोक पाठवून ही गाडी भारतात आणली जाणार आहे. अशाप्रकारे भारतातील एका राज्याबाबत भारताने घेतलेल्या निर्णयाबाबत आता पाकिस्तानने घाणेरडे राजकारण खेळायला सुरुवात केली आहे. (हेही वाचा: कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने घेतला भारतासोबत व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय)

साधारण पुढील दीड तासामध्ये भारतातील लोक वाघाला जातील व समझौता एक्सप्रेसला परत घेऊन येण्याची प्रक्रिया सुरु होईल. ही गाडी भारतामध्ये दुपारी 1 वाजता येणे अपेक्षित होते मात्र आता यासाठी उशीर होणार आहे. दरम्यान, 22 जुलै 1976 साली अटारी-लाहौर यादरम्यान समझौता एक्सप्रेस सुरु झाली होती. समझोता एक्सप्रेस दिल्ली, अटारी आणि लाहोर मार्गावर धावणारी साप्ताहिक ट्रेन आहे.