Air India | (Photo Credits: Facebook)

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. या लोकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने एअर इंडियाची 2 विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोन्ही विमाने शनिवारी पहाटे दोन वाजता उड्डाण करण्यास सुरुवात करतील. ही विमाने रोमानियाची राजधानी बुखारेस्ट मार्गे लोकांना एअरलिफ्ट करतील.

दरम्यान, भारतीय निर्वासन पथके रोमानियाच्या सीमेवर पोहोचली आहेत. तेथून युक्रेनची राजधानी कीव येथे फक्त 12 तासांच्या ड्रायव्हिंगने पोहोचता येते. बचाव पथक भारतीय लोकांना बुखारेस्टला आणणार आहे. यानंतर हे लोक विमानात चढतील. नागरी उड्डाणांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे, भारतीय नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परतण्यासाठी बुखारेस्टला जातील. (वाचा - Ukraine-Russia Crisis: रशियाने युक्रेनवर हल्ला का केला? त्यामागे Vladimir Putin यांचा काय हेतू आहे? जाणून घ्या सविस्तर)

युक्रेनमध्ये सुमारे 18 हजार भारतीय अडकले -

गुरुवारी, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले की, भारत सरकार तेथे अडकलेल्या सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. युक्रेनमध्ये हवाई उड्डाण बंद असल्याने पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

याशिवाय शुक्रवारी अनेक भारतीय नागरिकांनी कीवमधील भारतीय दूतावासात आश्रय घेतला. दूतावासाच्या परिसरात गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारतीय दूतावासाने भारतीय लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांना लवकरच पर्यायी मार्गाने बाहेर काढण्याची योजना आखली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.