Dead-pixabay

भारतीय वंशाचे जोडपे (Indian-Origin Family) आणि त्यांची किशोरवयीन मुलगी डोव्हर, मॅसॅच्युसेट्स (Massachusetts ) येथील त्यांच्या 5 दशलक्ष डॉलर्सच्या भव्य वाड्यात मृतावस्थेत (Indian-Origin Family Found Dead) आढळून आले आहेत. मृत्यूचे कारण अद्याप पुढे आले नाही. मात्र, तपास अधिकार्‍यांना घरगुती हिंसाचारातून हे कृत्य झाल्याचा संशय आहे. राकेश कमल (वय 57), टीना कमल (वय 54), आणि त्यांची 18 वर्षांची मुलगी एरियाना अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांचे मृतदेह गुरुवारी संध्याकाळी आढळून आले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. या कुटुंबाच्या मृत्यूसंबंधी पोलिसांना अद्याप तरी कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही. मात्र, तपासात अनेक बाबी पुढे येतील असे पोलिसांनी म्हटले आहे.

आर्थिक संकटाचा सामना

कमल कुटुंबीय बोस्टनच्या नैऋत्येस सुमारे 32 किलोमीटरवर वसलेल्या डोव्हर येथे राहात असे. तसेच,हे कुटुंब एकेकाळी प्रसिद्धअसलेल्या मात्र आता बंद पडलेल्या शिक्षण प्रणाली कंपनी EduNova शी संबंधित होते. या कुटुंबाला अलिकडील काही काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता, असे समजते. पोलिसांनी या कुटुंबाबात त्यांच्या नातेवाईकांकडून काही माहिती मिळवली आहे. या माहितीमध्ये एका नातेवाईकाने हा हत्येचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Texas Road Accident: टेक्सासमध्ये भीषण रस्ता अपघात, भारतीय वंशाच्या कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू)

नातेवाकाने व्यक्त केली हत्येची शक्यता

दरम्यान, स्थानिक प्रांताचे प्रमुख मायकेल मॉरिसे यांनी मृतदेह वैद्यकीय परिक्षणासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक तपशील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तपास त्याच्या प्राथमिक टप्प्यात आहे आणि मॉरिसे यांनी ठळकपणे जोर देत सांगितले की निवासस्थानाशी संबंधित कोणतेही पोलिस अहवाल किंवा घरगुती हिंसाचाराच्या घटना नाहीत. शेजाऱ्यांशी त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते. दरम्यान, कमल कुटुंबाचा वाडा एका वर्षापूर्वी फोरक्लोजरमध्ये गेला होता, त्यानंतर विल्सनडेल असोसिएट्स एलएलसीला तो त्यांनी तीन दशलक्ष डॉलरमध्ये विकला होता.

कौटुंबिक पार्श्वभूमी

राकेश कमल आणि टीना कमल, या दोन्ही कुशल व्यक्तींनी, 2016 मध्ये EduNova ची सह-स्थापना केली. विद्यार्थ्यांच्या ग्रेड वाढविण्यासाठी डिझाइन केलेल्या या उपक्रमाला "विद्यार्थी यश प्रणाली" असे नाव दिले होते. कंपनी डिसेंबर 2021 मध्ये बंद पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूचीबद्ध टीनाने सप्टेंबर 2022 मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तो दायित्वांचा हवाला देऊन आणि अपुऱ्या कागदपत्रांमुळे डिसमिस करण्यात आला होता.

हार्वर्डच्या माजी विद्यार्थिनी, टीनाने अमेरिकन रेड क्रॉस ऑफ मॅसॅच्युसेट्सच्या संचालक मंडळावर काम केले होते. शिक्षण आणि तंत्रज्ञानातील त्यांचा अनुभव व्यापक होता. बोस्टन युनिव्हर्सिटी, एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी राकेश कमल यांनी एड्युनोव्हापूर्वी शिक्षण-सल्लागार क्षेत्रात कार्यकारी पदे भूषवली आहेत.