भारत अमेरिकेला खूश करण्यासाठी व्यापारी करार करु इच्छितो: डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Photo Credits: Getty/File)

अमेरिकेला खूश करण्यासाठीच भारत व्यापारी करार करु इच्छितो, असा सनसणीत टोला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लगावला आहे. अमेरिकन उत्पादनांवर लावण्यात आलेल्या शूल्कावरून ट्रम्प यांनी भारतावर सोमवारी निशाणा साधला. ट्रम्प यांनी यापूर्वीही अमेरिकन उत्पादनांवर लावण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कावरुन भारतावर निशाणा साधला आहे. असा निशाणा साधण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.

निशाणा साधताना ट्रम्प यांनी 'टेरिफ किंग' (उत्पादनशुल्क वाढीचा राजा) अशी उपाधी दिली. दरम्यान, ट्रम्प यांनी भारताला टोला लगावतानाच आम्हीही भारतीय उत्पादनांवर इतकाच कर लावू असा इशाराही दिला. तेव्हा, भारताने अमेरिकेसोबत व्यापारी करार करण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.

दरम्यान, ट्रम्प यांनी भारत अमेरिकेसोबत व्यापारी करार करण्याच इच्छुक असल्याचा पुनरुच्चार शनीवारीही केला होता. तर, व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही ट्रम्प यांच्या वृत्ताला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे दुजोरा दिला. मात्र, याबाबत अताच काही भाष्य करणे घाईचे ठरेल असेही तो म्हणाला.