
भारताने म्यानमार (Myanmar) मधील भूकंपामुळे (Earthquake) बाधित झालेल्या लोकांना मदत करण्याची व्याप्ती वाढवली आहे. रविवारी, भारताने म्यानमार भूकंपग्रस्तांसाठी 31 टन अधिक मदत साहित्य पाठवले. यामध्ये भारतीय सैन्याच्या 'फील्ड हॉस्पिटल'साठी आवश्यक असलेल्या वस्तूंचाही समावेश आहे. ही मदत 'सी-17 ग्लोबमास्टर' द्वारे पाठवण्यात आली. या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाने रविवारी सकाळी गाझियाबादमधील हिंडन एअर फोर्स स्टेशनवरून उड्डाण केले.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर यासंदर्भात पोस्ट शेअर करत काही फोटोही शेअर केले. ऑपरेशन ब्रह्मा'चा एक भाग म्हणून, एक C-17 विमान मंडालेसाठी रवाना झाले, ज्यामध्ये भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटल युनिटसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांसह 31 टन मानवीय मदत होती, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेच्या भूकंपात 3 हजार हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. (हेही वाचा -भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधणार 'झुरळं'; 'या' देशातील तंत्रज्ञानाचा करण्यात येणार वापर)
#OperationBrahma @IAF_MCC C-17 plane departs for Mandalay with 31 tons of humanitarian aid, including replenishment stores for the Indian army field hospital unit.
🇮🇳 🇲🇲 pic.twitter.com/cnZ7gwZvVK
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) April 6, 2025
औषधे आणि कपड्यांव्यतिरिक्त, भारताने म्यानमारच्या भूकंपग्रस्तांसाठी शेकडो टन धान्य देखील पाठवले आहे. जेणेकरून भूकंपग्रस्तांना उपासमारीपासून वाचवता येईल. भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर भारताने 'ऑपरेशन ब्रह्मा' नावाचे मदतकार्य सुरू केले होते. दरम्यान, भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयएनएस घरियाल, 405 टन तांदूळासह 442 टन मदत साहित्य घेऊन शनिवारी सकाळी यंगूनला पोहोचले. ते म्हणाले की, भारतीय राजदूत अभय ठाकूर यांनी यांगून प्रदेशाचे मुख्यमंत्री यू सोए थेन यांना मदत साहित्य सुपूर्द केले. यामुळे पीडितांना दिलासा मिळेल.