भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. पण भारताच्या बाजूला असलेल्या नेपाळ देशात पेट्रोल तुलनेने स्वस्त मिळत आहे. त्यामुळे लोकांनी सीमेवर पेट्रोलची तस्करी सुरु केली आहे. नेपाळमध्ये पेट्रोलची किंमत सुमारे 69 रुपये प्रति लीटर आहे. भारतातील किंमतीपेक्षा ही किंमत सुमारे 20 रुपयांनी कमी आहे. सुपौलच्या भागातून लोक पेट्रोल घेण्यासाठी नेपाळ सीमेवर जात आहेत.
पूर्वी सोने, मद्य याची तस्करी होत असे. मात्र आता जमाना बदलला असून लोक पेट्रोल-डिझेलची तस्करी करु लागले आहेत. नेपाळ-भारत सीमेवर पेट्रोल-डिझेलची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे तस्करी करणारे बक्कळ कमाई करत आहेत. नेपाळच्या सुनसरी, भंटाबाडी, इटहरी येथून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करुन भारतात विकण्याचा नवा ट्रेंड बनला आहे. यात पकडले गेल्यावर कोणत्याही प्रकारची शिक्षा नसल्याने तस्करी करणाऱ्यांमध्ये भीती उरलेलीच नाही.
विशेष बाब ही की, नेपाळमध्ये अधिकतर पेट्रोल-डिझेल हे भारतातून निर्यात होते. पण भारत नेपाळ सीमेवर कोणतीही बंधने नसल्यामुळे आणि भारतापेक्षा तिथे पेट्रोल 20 रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने ही तस्करी होत आहे. वाढती तस्करी रोखण्यासाठी एसएसबी आता लोकांच्या बाईकच्या टाक्या देखील तपासू लागली आहे. पण भारत-नेपाळ सीमा खुली असल्यामुळे पायवाटेवरुन तस्करी केली जात आहे.
भारतातून नेपाळमध्ये कोणताही सुविधा पास घेऊन 3-4 तासांसाठी जावून परत येणे शक्य आहे. गाड्यांसाठी बॉर्डर टोल भरावा लागतो. पण अनेक लोक टोल न भरताच पायवाटेवरुन नेपाळमध्ये जातात आणि 50-100 लीटर पेट्रोल-डिझेल घेऊन परत येतात.
भारत-नेपाळ सीमेवर तैनात असलेले कस्टम अधिकारी या भ्रष्टाचारास अधिक कारणीभूत ठरत आहेत. कस्टम अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर तस्करी रोखण्यासाठी सर्व वाहन्यांच्या तपासण्या सुरु करण्यात आल्या. त्यामध्येच अलिकडे 250 लीटर डिझेल जप्त करण्यात आले आहे.