Coronavirus (Photo Credits: ANI)

सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. अनेक प्रयत्न करूनही हा साथीचा रोग अजूनतरी अटोक्यात आला नाही. मात्र, जवळजवळ सर्व देशांमध्ये कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. सरकार लोकांना लस घेण्यासाठी उद्युक्त करत आहे व यासाठी लोकांना विविध प्रकारच्या ऑफरही दिल्या जात आहेत. असे असूनही, अनेक ठिकाणी लस घेण्याची भीती जनतेमध्ये दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर अमेरिकेच्या (America) एका राज्यात लसीबाबत देण्यात आलेली ऑफर चर्चेचा विषय ठरली आहे. अमेरिकेमधील ओहियो (Ohio) या राज्यात लस घेणाऱ्या लोकांना 10 लाख डॉलर्स म्हणजेच 7 कोटींहून अधिक रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

ओहियोच्या राज्यपालांनी नुतेच ट्विटच्या मदतीने या ऑफरची घोषणा केली आहे. माईक ड्वाइन (Mike DeWine) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 26 मेपासून ते कोरोना व्हायरस रिलीफ फंड्सकडून लॉटरी जाहीर करणार आहेत. ज्यांनी कोरोनाची एक तरी लस घेतली आहे असे सर्व लोक या सोडतीस पात्र ठरतील. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, दर बुधवारी या सोडती निघतील. ही ऑफर पुढील 5 आठवड्यांसाठी चालेल. प्रत्येक सोडतीतील 5 विजेत्यास दहा लाख डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल. ही रक्कम कोरोना मदत निधीतून दिली जाणार आहे. यामुळे अनेक लोक लस घेण्यास प्रेरित होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (हेही वाचा: कोरोना महामारी गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक भयंकर असेल; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा)

ओहियोमध्ये 2 जूनपासून जाहीर करण्यात आलेले अनेक कोरोना निर्बंधही हटवण्यात आले आहेत. ओहियोने भलेही लसीकरणासाठी लॉटरीची संकल्पना सुरू केली असेल, परंतु त्याआधीपासून उर्वरित राज्ये आणि स्थानिक सरकार ही लस लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा करत आहेत. पश्चिम व्हर्जिनियाचे राज्यपाल जिम जस्टिस यांनी गेल्या महिन्यात ही घोषणा केली होती. जिम यांनी जाहीर केले होते की 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनी ही लस घेतल्यास त्यांना  दिली तर त्यांना 100 डॉलर्सचा सेव्हिंग बॉन्ड दिला जाईल.