अमेरिकेत एका 49 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला मानवी तस्करी (Human Smuggling) प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर आता त्याला 45 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राइड हेलिंग अॅप उबरचा (Uber) वापर करून 800 हून अधिक लोकांची तस्करी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी न्याय विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या राजिंदर पाल सिंग उर्फ जसपाल गिल याने फेब्रुवारीमध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती.
राजिंदर हा तस्कर टोळीचा प्रमुख सदस्य म्हणून काम करत असे, असे त्याने स्वतः कबूल केले आहे. यासोबतच त्याने कॅनडातून शेकडो भारतीय नागरिकांना सीमेपलीकडे नेले आहे. त्या बदल्यात, त्याने 500,000 अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम घेतली आहे.
या प्रकरणी कॅलिफोर्नियातील रहिवासी राजिंदर पाल सिंग याला मंगळवारी अमेरिकन जिल्हा न्यायालयाने लोकांची तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली 45 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कार्यवाहक यूएस ऍटर्नी टेसा एम गोरमन यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत राजिंदर सिंगने 800 हून अधिक भारतीय नागरिकांची उत्तर सीमा आणि वॉशिंग्टन मार्गे अमेरिकेत तस्करी करण्यात मदत केली आहे.
न्यायाधीशांनी दोषी राजिंदर पाल सिंग हा वॉशिंग्टनच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले. तसेच यामुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या तस्करीच्या मार्गाने तस्करी करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेलाही धोका असल्याचे त्यांनी आपल्या निर्णयादरम्यान नमूद केले. गोरमन यांनी पुढे सांगितले की, सिंगच्या या कटात सहभागामुळे भारतीय नागरिकांच्या अमेरिकेतील चांगल्या जीवनाच्या आशांना हानी पोहोचली आहे, तसेच त्यांना 70,000 डॉलर्सच्या मोठ्या कर्जात टाकले गेले आहे. (हेही वाचा: U.S. H-1B Visa धारकांना आता Canada मध्ये काम करण्याची संधी; कुटुंबियांसाठी देखील शिक्षण, नोकरीची दारं खुली!)
जुलै 2018 पासून, राजिंदर सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडणाऱ्या लोकांना कॅनडाच्या सिएटल भागातून नेण्यासाठी उबरचा वापर केला. यासोबतच राजिंदर सिंग याने गेल्या चार वर्षांत मानवी तस्करीसाठी वाहतुकीशी संबंधित 600 हून अधिक ट्रिप्सचेही आयोजन केले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राजिंदर सिंग हा देखील बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत होता. त्याची तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला हद्दपार केले जाईल.