Hilton Times Square in NYC | (Photo Credits: Wikimedia Commons)

सध्या कोरोना विषाणूने (Coronavirus) जगभरात हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. कोरोना काळात कित्येक व्यवसाय बंद पडले, अनेक लोकांचे रोजगार गेले. याचा फटका हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला फार मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आता कोरोनामुळे अमेरिकेमधील एक लोकप्रिय हॉटेल बंद होत आहे. न्यूयॉर्क (New York) शहरातील हिल्टन टाईम्स स्क्वेअर (Hilton Times Square) हॉटेल 1 ऑक्टोबर पासून कायमचे बंद होणार आहे. जगातील सर्वात व्यस्त प्रदेशात 44 मजली हे हॉटेल त्याचा जगभरातील मोठ मोठ्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी लोकप्रिय होते. आता कोरोनमुळे हे हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे.

न्यूयॉर्कच्या कामगार विभागाच्या स्टेट डिपार्टमेंटकडे जाहीर फाइलिंगमध्ये ही घोषणा करण्यात आली. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत हे तब्बल 478 खोल्यांचे हॉटेल पूर्ण क्षमतेसह कार्यरत होते. जस जसा कोरोना साथीचा रोग सर्वत्र पसरू लागला, तस तसे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहर ‘व्हायरस ट्रान्समिशन’चा एक हॉटस्पॉट म्हणून उदयास आला. त्यावेळी 16 मार्चपासून हिल्टन टाईम्स स्क्वेअर बंद ठेवण्यात आले. जुलैपासून कोविड-19 च्या निर्बंधामध्ये शिथिलता आणली गेली असली तरी, इतक्या जास्त प्रमाणात खोली असलेल्या या हॉटेलला ग्राहक मिळेनासे झाले. या दरम्यान हॉटेलला त्याची कमाई वाढविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

कोरोनामुळे सध्या संस्था व्हर्च्युअल मीटिंगला प्राधान्य देत असल्यामुळे, कोरोना काळात देशभरातील व्यापारामध्ये घट निर्माण झाली. तसेच जगभरात लादलेल्या प्रवासी निर्बंधामुळे पर्यटन उद्योगाचीही वाताहत झाली आहे. आता हिल्टन टाईम्स स्क्वेअर बंद झाल्याने हॉटेलमध्ये नोकरी करणाऱ्या जवळपास 200 कामगारांवर त्याचा परिणाम होईल. (हेही वाचा: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध)

हिल्टन वर्ल्डवाइड होल्डिंग्स इंक, या ब्रँडच्या अंतर्गत हॉटेलच्या जागतिक चेनवर नियंत्रण ठेवले जाते. कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 432 दशलक्ष डॉलर्सचा तोटा झाला.  मॅकलिन-आधारित संस्थेने नुकत्याच जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हॉटेल इंडस्ट्रीला पुन्हा रुळावर येण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो.