Harvard University protester: पॅलेस्टाईन समर्थकांनी हार्वर्ड विद्यापीठात अमेरिकन ध्वजाच्या जागी पॅलेस्टिनी ध्वज उभारला, आत्तापर्यंत 900 जणांना अटक
Photo Credit -X

Harvard University protester :अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ (Harvard university) तील इस्रायल-विरोधी निदर्शकांनी हार्वर्ड यार्डमधील जॉन हार्वर्डच्या पुतळ्यावर अमेरिकन ध्वज (American flag) साठी राखीव असलेल्या जागी पॅलेस्टिनी ध्वज (Palestinian flag) फडकावला. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात 18 एप्रिल रोजी झालेल्या सामूहिक अटकेनंतर देशभरात अटक झालेल्या पॅलेस्टाईन समर्थकांची संख्या 900 वर पोहोचली आहे. हे निदर्शन आयव्ही लीग शाळेच्या कॅम्पसमध्ये शनिवारी घडलं.

या संपूर्ण घटनेवर हार्वर्ड विद्यापीठातील प्रवक्त्यांनी या घटनेला "विद्यापीठाच्या धोरणाचे उल्लंघन" असे म्हटले आहे. त्याशिवाय,"संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल" असे सांगितले.शनिवारी, २७ एप्रिल रोजी ब्लूमिंग्टन येथील इंडियाना युनिव्हर्सिटी, ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी आणि सेंट लुईसमधील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीसह विविध कॅम्पसमध्ये सुमारे 275 पॅलेस्टाईन समर्थकांना अटक करण्यात आली.

हार्वर्ड क्रिमसन या विद्यार्थी वृत्तपत्राने सांगितले की, शनिवारी संध्याकाळी कॅम्पसमध्ये तीन पॅलेस्टिनी झेंडे फडकवण्यात आले. हार्वर्ड यार्ड ऑपरेशन्सच्या कर्मचाऱ्यांनी ध्वज काढून टाकताच, आंदोलकांनी “शेम” अशी घोषणाबाजी केली. आणि “फ्री, फ्री पॅलेस्टाईन” आणि पॅलेस्टाईन मुक्त होईल” असा नारा दिला.

लॉस एंजेलिसमध्ये रविवारी इस्रायल समर्थक आणि पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांमध्ये चकमकी पाहायला मिळाल्या. वॉशिंग्टन, डीसीमधील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी निदर्शने पहायला मिळाली. जिथे विद्यार्थ्यांनी उद्यानात, रस्त्यावर डझनभर तंबू उभारल्याचे वृत्त सीएनएनने दिले. काहींनी फ्री पॅलेस्टाईनचा नारा दिला.

दक्षिण गाझाच्या रफाह येथील निर्वासित शिबिरात, पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांनी यूएस कॉलेज कॅम्पसमध्ये दिसलेल्या समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी "कोलंबिया विद्यापीठाचे विद्यार्थ्यांनो आमच्या पाठीशी उभे राहा" असे बॅनर विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते.युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये कॅम्पसच्या मालमत्तेची तोडफोड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विद्यापीठाने म्हटले आहे की हे "आमच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे तळ ठोकून राहिलेल्या गटाचा भाग असलेल्या व्यक्तींनी" ही तोडफोड केली.