Hanzla Adnan Killed in Pakistan: हाफीस सईद याचा निकटवर्ती हंजला अदनान याची गोळ्या घालून हत्या
Photo Credit - Twitter

भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) पाकिस्तानमध्ये (Pakistan) मारला गेला. 2015 मध्ये जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा कट रचणारा लष्कर-ए-तैयबा (LeT) दहशतवादी हंजला अदनान (Hanzla Adnan) याची पाकिस्तानमधील कराचीमध्ये (Karachi) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली आहे. 2015 मध्ये हंजलाने जम्मूच्या उधमपूरमध्ये बीएसएफच्या (BSF) ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात बीएसएफचे 2 जवान शहीद झाले तर 13 बीएसएफ जवान जखमी झाले.  (हेही वाचा - दहशतवादी हाफिज सईदच्या साथीदाराची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या)

एवढेच नाही तर 2016 मध्ये पंपोरमध्ये सीआरपीएफच्या (CRPF) ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा हंजाला मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले, तर 22 जवान जखमी झाले. या दोन्ही हल्ल्यांमध्ये हंजला पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांना सूचना देत होता. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा (Mumbai Attack) सूत्रधार, लष्कर प्रमुख हाफिज सईदचा (Hafiz Saeed) जवळचा मानला जाणारा हंजला अदनान याला 2 आणि 3 डिसेंबरच्या मध्यरात्री त्याच्या घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, हंजलाला चार गोळ्या लागल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, अदनान अहमदला त्याच्या सुरक्षित घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या, गोळी झाडल्यानंतर त्याला पाकिस्तानी लष्कराने गुप्तपणे कराची येथील रुग्णालयात दाखल केले. 5 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. हाफिजसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पुलवामा भागात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात हंजलाचा मोठा हात होता.