इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने लैंगिक गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जोरदार दणका दिला आहे. कंपनीने आपल्या १३ वरिष्ठ मॅनेजरसह तब्बल ४८ कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले आहे. कारवाईचा बडगा उगारण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर पाठीमागील दोन वर्षांपासून लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप होता. गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूंदर पिचई यांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान, सुंदर पिचई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात 'आपल्यावर (कर्मचारी) असलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे कंपनीला चौकशीअंती हा निर्णय घ्यावा लागला', असे म्हटले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने अँड्रॉयड निर्माता अँडी रुबिन यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपासंदर्भात दिलेल्या वृत्तात पिचई यांचे पत्र प्रसिद्ध केले आहे. लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर रुबीन यांना ९० मिलियन डॉलरचे पॅकेज देऊन कंपनीतून काढण्यात आल्याचा उल्लेख या वृत्तात करण्यात आला आहे. दरम्यान, रुबिन यांच्या प्रवक्त्याने मात्र या वृत्तातील माहितीचे खंडण केले आहे. रुबिन यांनी २०१४मध्येच कंपनी सोडली होती. (हेही वाचा, #MeToo माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न : आलिया भट्टची आई सोनी राजदानची खळबळजनक #MeToo कहाणी)
दरम्यान, सुंदर पिचई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त वाचून फार दु:ख झाले. गूगल अशा प्रकरणांमध्ये अतिशय गंभीर आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा देण्यासाठी कटीबद्ध आहे. याच पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे, आम्ही हे सांगू इच्छितो की, लैंगिक गैरवर्तन, शोषणाबाबत झालेल्या प्रत्येक आरोपाची आम्ही सखोल चौकशी केली. त्यानंतरच आम्ही हे पाऊल उचलले.