Russia Ukraine War: युक्रेनच्या चार प्रदेशांचा रशियामध्ये समावेश, राष्ट्राध्य व्लादिमीर पुतीन यांच्याकडून करारावर स्वाक्षरी
Vladimir Putin | (Photo Credits: Wikimedia Commons)

रशिया युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) युक्रेनला मोठा धक्का बसला आहे. रशियाने एक मोठी कारवाई करत युक्रेनेचे चार प्रदेश घशात घातले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी औपचारीकपणे याबाबच्या करारावर स्वाक्षरी केली. धक्कादायक म्हणजे स्थानिक नागरिकांच्या इच्छेनुसारच युक्रेनच्याया भूभागांचा समावेश रशियात झाल्याचे रशियन प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. डोनेस्तक (Donetsk), लुहान्स्क (Donetsk), खेरसन (Kherson ) आणि झापोरिझिया (Zaporizhia ), अशी या चार प्रदेशांची नावे आहेत.

अल जजीराच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, व्लादिमीर पुतिन यांनी क्रेमलिन समारंभात सेंट जॉर्ज हॉलमध्ये युक्रेनियन प्रदेशांच्या विलयीकरणाची घोषणा केली. या वेळी त्यांनी एक प्रदीर्घ भाषण केले. हे भाषण युक्रेन आणि त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांबद्दल अत्यंत टीकात्मक वक्तृत्वाने भरलेले होते. (हेही वाचा, Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे प्रत्येक पाचवा माणूस गरिबी आणि उपासमारीचा बळी ठरू शकतो- UN चा मोठा दावा)

पुतिन म्हणाले की, नव्याने जोडलेल्या चार संलग्न प्रदेशातील रहिवासी आता रशियाचे “कायमचे नागरिक” असतील. या प्रदेशांच्या जोडणीद्वारे सोव्हिएत युनियनचे पुनरुज्जीवन करण्याच्या मागणीला नकार देताना, पुतिन यांनी पाश्चात्य राज्यांवर आरोप केला - त्यांनी युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल मॉस्कोवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. पुतिन यांनी पुढे असे देखील म्हटले की रशिया आता आपल्या नवीन प्रदेशाचे सर्व मार्गांनी रक्षण करेल.

सार्वमताच्या पुढे जाण्याच्या आणि प्रदेशाच्या विलयीकरणाची घोषणा करण्याच्या निर्णयाचा बचाव करताना, रशियन अध्यक्षांनी असा युक्तिवाद केला की डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझिया येथील लोकांचा रशियामध्ये सामील होणे हा "अविभाज्य अधिकार" आहे, असे एएनआयने म्हटले आहे. पुतिन यांनी दावा केला की पूर्व युक्रेनमधील डोनेस्तक आणि लुहान्स्क बनलेले लोक - "कीव राजवटीने केलेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यांचे बळी" होते.