Nawaz Sharif Attacked In London: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये हल्ला; मुलगी मरियमने केली इम्रान खानला अटक करण्याची मागणी
Nawaz Sharif, Maryam Nawaz (PC - PTI, Facebook)

Nawaz Sharif Attacked In London: पाकिस्तानमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पीएमएल-एनच्या नेत्या मरियम (Maryam) नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांनी देशाचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधानांवर देशातील जनतेला भडकावल्याचा आरोप केला आहे. शनिवारी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर सत्ताधारी पीटीआय पक्षाच्या कार्यकर्त्याने लंडनमध्ये हल्ला केला. इम्रान खान यांनी देशातील जनतेला अविश्वास प्रस्तावापूर्वी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

इम्रान खानच्या अटकेची मागणी करत मरियम यांनी ट्विट केले की, पीटीआयचे जे हिंसाचाराचा अवलंब करून हिंसक परिस्थिती निर्माण करत आहेत. त्यांना तात्काळ अटक करून तुरुंगात टाकावे. लोकांना भडकावणाऱ्या इम्रान खानलाही अटक व्हायला हवी, अशी मागणीही मरियम यांनी केली आहे. (हेही वाचा - पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा म्हणाले- भारताने पाऊल उचलले तर काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आम्हीही पुढे जाण्यास तयार)

नवाझ शरीफ यांच्यावरील हल्ल्याची माहिती देताना एका पाकिस्तानी पत्रकाराने सांगितले की, आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी पंतप्रधानांवर हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा नॅशनल असेंब्ली आज अविश्वास प्रस्तावावर मतदान करणार आहे. विरोधकांवर हल्लाबोल करताना इम्रान खान यांनी विरोधी पक्षनेते आणि पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ यांनी सत्ता हाती घेतली तर ते अमेरिकेची गुलामगिरी करतील, असेही म्हटले आहे.

इम्रान खान यांनी एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांना अमेरिकेचे गुलाम म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही गरीब आहोत. पण आम्ही कोणाचे गुलाम नाही. कार्यक्रमादरम्यान त्यांनी देशातील जनतेला विचारले की, आम्ही गरीब आहोत, तर कोणाची गुलामगिरी करायची का? विशेष म्हणजे पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. ज्यावर आज मतदान करण्यात येणार आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, सध्याच्या सरकारने बहुमत गमावले आहे. कारण, त्यांच्या काही मित्रपक्षांनी त्यांना सोडले आहे. लवकरच शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान असतील.