काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Ex-Pakistan PM Imran Khan) यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने एक मोठा झटका दिला. तोषखाना प्रकरणात इम्रान खान यांना अपात्र ठरवण्यात आले होते. आता इम्रान खान 5 वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. तोषखाना प्रकरणी आलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता इम्रान खान यांच्या अडचणीमध्ये अजून वाढ झाली आहे. इम्रान खान यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
इम्रान खान यांच्या या आरोपाबाबत इस्लामाबादच्या सचिवालय पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दाखल करण्यात आलेला एफआयआर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) चे खासदार मोहसिन शाहनवाजा रांझा यांच्याकडून असल्याचे जिओ टीव्हीने सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (PTI) समर्थकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप रांझा यांनी केला आहे.
रांझा यांच्या म्हणण्यानुसार, हे समर्थक इम्रान खान यांना तोषखाना प्रकरणात अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला विरोध करत होते. रांझा यांनी आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, तोषखाना प्रकरणात ते प्रतिवादी म्हणून हजर झाले तेव्हा इम्रान खान यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. रांझा सांगतात की, आयोगाच्या कार्यालयातून ते बाहेर येताच इम्रान यांच्या सांगण्यावरून त्यांच्या समर्थकांनी आपल्याला मारण्याच्या उद्देशाने लक्ष्य केले.
जिओ टीव्हीने रांझा यांच्या हवाल्याने सांगितले की, कारची काच फोडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी दगडफेकही झाली. पीटीआय नेत्याच्या सांगण्यावरून श्रीनगर महामार्ग रोखण्यात आल्याचेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. शुक्रवारी आयोगाने इम्रान खान यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर आयोगाच्या निर्णयाविरोधात पीटीआय समर्थक देशभरात निदर्शने करत आहेत. (हेही वाचा: कोण होणार ब्रिटेनचे नवे पंतप्रधान? पुन्हा एकदा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावाची पंतप्रधान पदासाठी चर्चा)
दरम्यान, इम्रान खान यांच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही शनिवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 2018 मध्ये इम्रान पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले आणि यावर्षी एप्रिलमध्ये त्यांची खुर्ची गेली. त्यांच्या कार्यकाळात अरब आणि युरोपीय देशांच्या दौऱ्यात त्यांना अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. इम्रान यांनी या भेटवस्तू स्वस्तात विकून त्याचा नफा मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, तोषखाना मंत्रिमंडळाचा असा विभाग आहे, जिथे इतर देशांचे सरकार, राष्ट्रप्रमुख आणि परदेशी पाहुण्यांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू ठेवल्या जातात.