धक्कादायक! कृत्रिम गर्भधारणा करण्यासाठी डॉक्टरने वापरले स्वतःचे वीर्य, पेशंट्सचा विश्वासघात करत दिला अनेक मुलांना जन्म
Representational image (Photo Credits: Public Domain Pics | Representational Image)

सध्या कृत्रिम गर्भधारणा (Artificially Inseminate) ही गोष्ट फार कॉमन झाली आहे. ज्या जोडप्यांना मुल होण्यामध्ये काही समस्या असतात, त्यांच्यासाठी कृत्रिम गर्भधारणा हे वरदान आहे. तर अशाप्रकारे कृत्रिम गर्भधारणा करण्यासाठी कॅनडामधील एका डॉक्टरने चक्क स्वतःचे वीर्य (Sperm) वापरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार समोर आल्यावर आता या डॉक्टरचा परवाना (Medical Licence) रद्द करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेली 30 वर्षे हा डॉक्टर अशाप्रकारे आपल्या पेशंट्सचा विश्वासघात करत करत होता.

बनार्ड नॉरमन बारवीन (Dr. Bernard Norman Barwin – 80) असे या डॉक्टरचे नाव असून, महिलांच्या गर्भाशयात चुकीचे वीर्य सोडून त्याने 50 ते 100 बाळांचा जन्म घडवून आणला आहे, यामध्ये त्याने स्वतःच्या विर्याचाही वापर केला आहे. 11 प्रकरणांमध्ये या डॉक्टरने स्वतःचे वीर्य वापरले आहे, याची कोणालाही माहिती नव्हती. एका प्रकरणामध्ये तर मुलगी 25 वर्षांची झाल्यावर तिला तिचे खरे वडील बारवीन असल्याचे समजले. सध्या कोर्टात या खटल्याची सुनावणी चालू आहे. (हेही वाचा: महिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द)

या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जन्मलेल्या एका बाळाला सेलिअ‍ॅक हा आजार झाला होता. त्याच्यावर उपाय करण्यासाठी जेव्हा जनुकीय पार्श्वभूमी तपासली तेव्हा या बाळासाठी चुकीचे वीर्य वापरले असल्याचे समोर आले. त्यानंतर इतर पालकांनीही त्यांची जुळी मुले एकसारखी नसल्याचे लक्षात आले. त्यानंतरच्या तपासात अनेक प्रकरणांमध्ये चुकीचे वीर्य तर काही प्रकरणांमध्ये स्वतःचे वीर्य वापरल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बारवीनला 10 हजार अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावून, त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.