Fake Bomb Threats: शाळकरी मुलींचा Nude Photos शेअर करण्यास नकार; माथेफिरू तरुणाने देशभरात दिल्या 150 हून अधिक बॉम्ब स्फोटाच्या धमक्या
प्रातिनिधिक | संग्रहित | संपादित प्रतिमा

अमेरिकेमध्ये (US) शाळा, प्रार्थनास्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी 150 हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या (Fake Bomb Threats) दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. किशोरवयीन मुलींनी नग्न फोटो पाठवण्यास नकार दिल्यानंतर या व्यक्तीने विविध ठिकाणी 150 बनावट बॉम्बच्या धमक्या दिल्या. यूएस न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार आरोपी, एडी मॅन्युएल नुनेझ सॅंटोस (Eddie Manuel Nunez Santos) हा एक 33 वर्षीय वेबसाइट डेव्हलपर असून तो पेरू येथील रहिवासी आहे. त्याला मंगळवारी लिमा, पेरू येथील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या महिन्याच्या सुरुवातीला त्याने बॉम्ब धमक्या पाठवल्याचा आरोप आहे.

अहवालानुसार, सॅंटोसने खोटे ऑनलाईन खाते तयार केले होते. या ठिकाणी तो मुलींकडे नग्न फोटोंची मागणी करत असे. मुलींनी त्याला असे फोटो पाठवण्यास किंवा त्याच्याशी संवाद साधण्यास नकार दिल्यानंतर, त्याने कथितपणे त्यांच्या शाळांवर बॉम्बस्फोट करण्याची किंवा त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, सॅंटोसने दिलेल्या खोट्या धमक्यांमुळे न्युयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, कनेक्टिकट, ऍरिझोना आणि अलास्का यासह अनेक राज्यांमध्ये दहशत पसरली होती.

यामुळे हजारो शाळकरी मुलांना शाळेबाहेर काढावे लागले. हॉस्पिटलचे लॉकडाउन केले गेले, तसेच अनेक फ्लाइट्सना विलंब झाला. यूएस अॅटर्नी डॅमियन विल्यम्स म्हणाले की, या खोट्या धमक्यांमुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सार्वजनिक सुरक्षा संसाधनांना मोठा त्रास सहन करावा लागला. या बॉम्बच्या धमक्या ईमेल किंवा ऑनलाइन संपर्क फॉर्मद्वारे पाठविण्यात आल्या होत्या. (हेही वाचा: Brooklyn Flooding: अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधील ब्रुकलिन शहरात पावसाचा हाहाकार; कचर्‍याचे डब्बेही गेले वाहून)

आता सॅंटोसला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्याच्यावर धमकी देणारा संदेश प्रसारित करणे, खोटी माहिती शेअर करणे, फसवणूक करणे, मुलांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणे, अल्पवयीन व्यक्तीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणे आणि बाल पोर्नोग्राफी प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत.