( PC - PTI Representative image)

अमेरिका-इराण संघर्षात सध्या वाढ होतानाचे चित्र स्पष्ट होत आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दुतावासावर शनिवारी रात्री रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले आहे. बगदादमध्ये अमेरिकेने शुक्रवारी सकाळी ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणी लष्करातील कमांडर जनरल कासीम सुलेमानी मारला गेला. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी रात्री उशिरा इराणने बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर प्रतिहल्ला केला आहे.

अमेरिका आणि इराणमधील वाद अधिक चिघळत चालला आहे. अमेरिका-इराण हे दोन्ही देश एकमेकांना हल्ल्याच्या माध्यमातून प्रतिउत्तर देत आहेत. तसेच हे प्रतिउत्तराचे सत्र सुरू असतानाच इराणमधील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला आहे. याचा अर्थ इराणने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्याचा हा संकेत आहे, असं म्हटलं जात आहे. (हेही वाचा - अमेरिका आणि इराण मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोनं 45 हजारांवर जाण्याची शक्यता)

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उघडपणे चेतावणी दिली आहे. इराणने अमेरिकेवर हल्ला केला तर इराणच्या 52 ठिकाणावर हल्ला करण्यात येईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच अमेरिकेचं सैन्य युद्धासाठी सज्ज असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं कुवेतमधील आपलं सैन्य बगदादमध्ये पाठवलं आहे. तसेच आखाती देशामध्ये अमेरिकेकडून 3 हजार सैनिक पाठवण्यात आलं आहे.

अमेरिकेने गुरुवारी रात्री इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी याचा रॉकेट हल्ल्यात खात्मा केला होता. त्यानंतर पुन्हा शनिवारी अमेरिकेने हवाई हल्ला केला होता. यात 6 जण ठार झाले होते. या हल्ल्याला प्रतित्युत्तर देण्यासाठी इराणने रात्री उशिरा अमेरिकेच्या सैन्यतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला.