रशिया-यूक्रेन युद्धामध्ये Elon Musk यांची उडी; Ukraine ला पाठवली मोठी मदत
Elon Musk (Photo Credits: Getty Images)

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) सुरू असलेल्या युद्धात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क (Elon Musk) यांनीही उडी घेतली आहे. रशियाऐवजी एलोन मस्क यांनी युक्रेनला मदत केली आहे. SpaceX च्या CEO ने युक्रेनला उपग्रह ब्रॉडबँड सेवा प्रदान करण्यासाठी Starlink टर्मिनल पाठवले आहेत. एलोन मस्कच्या या निर्णयाचे खूप कौतुक होत आहे. युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह (Mykhailo Fedorov) यांनी ट्विटरवर एलोन मस्क यांच्याकडे मदत मागितली होती, त्यानंतर मस्क यांनी त्यांचे टर्मिनल युक्रेनला पाठवले.

मायखाइलो फेडोरोव्हने त्याच्या ट्विटर हँडलवर एडिशनल टर्मिनल्सच्या बॅचचा फोटो शेअर केला आहे. यांचा वापर SpaceX च्या Starlink उपग्रह इंटरनेट सेवेसाठी केला जाईल. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे- ‘स्टारलिंक येथे आहे, धन्यवाद एलोन मस्क.’ रशियाच्या सायबर हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीवसह पूर्व आणि दक्षिणेकडील शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद पडली. यानंतर युक्रेनने मस्ककडे मदत मागितली, त्यानंतर त्यांनी तात्काळ युक्रेनमधील स्टारलिंक सेवा सक्रिय केली.

युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह यांनी एलोन मस्क यांना टॅग करत ट्वीट केले होते की, ‘युक्रेनवर रशियाकडून सातत्याने हल्ले होत आहेत. आम्हाला तुमच्या मदतीची तातडीने गरज आहे. एलोन मस्क तुम्ही मंगळावर घर बांधण्याचा विचार करत आहात, इथे रशिया युक्रेनवर कब्जा करत आहे. आपले रॉकेट अवकाशात यशस्वीपणे उतरत आहेत, मात्र रशियन रॉकेट युक्रेनमधील नागरिकांना लक्ष्य करत आहेत. आम्‍ही तुम्‍हाला युक्रेनमध्‍ये स्टारलिंक स्‍टेशन प्रदान करण्‍याची विनंती करतो, जेणेकरून आम्‍हाला रशियाचा सामना करता येईल.’ (हेही वाचा: Russia-Ukraine War: रशियाने अवघ्या दोन सेकंदात क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त केली प्रशासकीय इमारत; Watch Video)

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध वाढत आहे. बेलारूसमध्ये सोमवारी दोन्ही देशांमधील चर्चा निष्फळ ठरली. दुसरीकडे रशियानेही अणुचाचण्यांची तयारी सुरू केली आहे. वृत्तानुसार, 64 किमी लांबीचा रशियन लष्करी ताफा युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेने जात आहे. त्याचे सॅटेलाइट फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. त्याच वेळी, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत आणीबाणीच्या चर्चेच्या बाजूने 29 मते पडली आहेत. भारतासह 13 देशांनी या मतदानात भाग घेतला नाही.